प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : येथील आसरानगर परिसरातील कचरा डेपोत (मैल खड्डा) नियम व अटींचा भंग करुन साचलेल्या कचर्याची बायोमायनिंग प्रक्रिया न करताच विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आमदार राहुल आवाडे यांच्यामुळे उघडकीस आला आहे. निविदा प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन होत असतानाही महानगरपालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मक्तेदार प्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाची झाडाझडती घेतली.
इचलकरंजी शहरातून दैनंदिन 100 ते 120 टन कचरा उठाव केला जातो. हा कचरा आसरानगर परिसरातील मैलखड्डा याठिकाणी टाकला जातो. वर्षानुवर्षे या कचर्यावर प्रक्रियाच न केल्याने व त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न न झाल्याने याठिकाणी कचर्याचे डोंगर उभे राहिले. त्यातूनच या कचर्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यातून निर्माण होणार्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांच्या समस्या सातत्याने भेडसावत आहेत. घनकचरा अंतर्गत बायोमायनिंग प्रकल्प सुरु झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार राहुल आवाडे यांनी कचरामुक्त डेपो करण्याची ग्वाही आसरानगर भागातील नागरिकांना दिली होती. त्यानुसार त्यांनी माहिती घेत सुट्टीच्या दिवशी कचरा डेपोवर धडक भेट दिली. यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार व मिंटू सुरवशे होते.
कचरा डेपोतील जवळपास 5.49 मे.टन कचर्यावर प्रक्रिया करुन तो उठाव करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान 1.0 अंतर्गत याठिकाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत बायोमायनिंग सुरु केले. पहिल्या टप्प्यात 1.99 मे.टन कचर्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी 8 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन ते काम पूर्ण झाले. त्यानंतर उर्वरीत 3.49 मे.टन कचर्यावर प्रक्रियेसाठी भारत मिशन 2.0 अंतर्गत 18.57 कोटीचा डीपीआर तयार करण्यात आला. मात्र शासनाकडून 1.1 मे.टन कचर्यावर प्रक्रियेसाठी 5.57 कोटीचा निधी मंजूर झाला. या कामाची निविदा पुणे येथील आदर्श भारत इन्व्हीरो प्रा. लि. या कंपनीला देण्यात आली. निविदेमध्ये 30 एप्रिल 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची अट आहे. कामाचा आदेश 26 सप्टेंबर 2024 ला दिला असला तरी प्रत्यक्षात कामाची सुरुवात 25 जानेवारी 2025 ला झाली आहे. परंतु याठिकाणी कचर्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा असतानाही सातत्याने विनाप्रक्रिया कचरा उचलला जात असल्याच्या तक्रारी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची आमदार आवाडे यांनी शहानिशा करुन खात्री केली. आणि अचानकपणे कचरा डेपोवर धडक भेट दिली. त्यामुळे मक्तेदारासह महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळा उडाली. आमदार आवाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे त्याचबरोबर रजिस्टर व नोंदीच्या आकडेवारीत फेरफार असल्याचे निदर्शनास आले. आमदार आवाडे यांनी या संदर्भात मक्तेदार प्रतिनिधीकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आमदार आवाडे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून योग्य ती माहिती लिखीत स्वरुपात देण्याची मागणी केली. मक्तेदार कंपनीकडून निविदा प्रक्रियेतील नियम व अटींचे सर्रास उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यातून व तत्कालीन आरोग्य सभापती संजय केंगार यांच्या प्रयत्नातून कचरामुक्त डेपोसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लागण्यासह उर्वरीत कचर्यावर प्रक्रियेसाठी आवश्यक 13 कोटीचा निधी उपलब्ध होण्यासाठी आणि आसरानगर भागातील नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आमदार आवाडे यांनी प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा अशी नागरिकांची मागणी आहे. त्याचबरोबर झाल्या प्रकाराबद्दल आमदार आवाडे काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.