राज्याचे विद्यमान अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्याचे माजी पोलीस आयुक्त व राज्याचे विद्यमान अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता  यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमिताभ  गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी पूर्ण केली असून, आता उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे. उच्चपदस्थ आयपीएस  अधिकाऱ्याची अशा प्रकारे चौकशी होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. त्यामुळे या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट  यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू करण्यात आली होती. गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर आता एसीबीच्या महासंचालकांकडे उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे. या परवानगीनंतर अमिताभ गुप्ता यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.आल्हाट यांच्या तक्रारीनुसार, यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता आहे. पुण्यातील ॲमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॉटर विला प्रकल्पात त्यांचा एक आलिशान विलां आहे. या विलाची किंमत तब्बल 25 कोटी रुपये इतकी असल्याचा दावा आल्हाट यांनी केला आहे. याशिवाय, मुंबईतील सांताक्रुझ येथे त्यांचा 22 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट  असल्याचेही आल्हाट यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्यामुळे अमिताभ गुप्ता यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबीने केलेल्या गुप्त चौकशीत या संदर्भात काही महत्वाचे धागेदोरे सापडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता एसीबीने उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे.

 यांच्या उघड चौकशीला लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी सुधीर आल्हाट यांनी केली आहे. तसेच, गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात दाखल केलेले काही गुन्हे आणि दिलेले रिव्हॉल्वर परवाने यांचीही चौकशी करण्याची मागणी आल्हाट यांनी केली आहे. त्यामुळे, गुप्ता यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो आणि त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसीबीच्या महासंचालकांनी उघड चौकशीला परवानगी दिल्यास अमिताभ गुप्ता यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post