प्रेस मीडिया लाईव्ह :
सोमवार ता.६ जानेवारी २०२५ रोजी 'पत्रकार दिन 'आहे. या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील सर्व बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा.१९३ वर्षापूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. त्याच्या आधी त्रेपन्न वर्षे जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ' द बंगाल गॅझेट 'भारतातील पहिले वृत्तपत्र २९ जानेवारी १७८० रोजी प्रकाशित केले होते. तसेच ' कलकत्ता जनरल एडवर्टाइजर 'या नावाने हीकीने साप्ताहिकही काढलेले होते. हिकी हा उद्योजक होता. त्याचे अनेक उद्योग होते त्यापैकी हा एक होता. त्याने भारतात वृत्तपत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली पण तो त्याबाबत फारसा गंभीर नव्हता हेही खरे आहे. पण त्याच्यामुळे भारतातील विविध प्रादेशिक भाषेत वृत्तपत्र निघालेला प्रेरणा मिळाली हे निश्चित.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण नंतर प्रभाकर ,धूमकेतू ,केसरी, मराठा, ज्ञानदीप, ज्ञान सिंधू , मित्रोदय, बालबोधमेवा,ज्ञानप्रकाश, हिंदू पंच,सुबोध पत्रिका, प्रभाकर, किरण, दीनबंधू , मूक नायक, बहिष्कृत भारत, यंग इंडिया, काळ अशी अनेक वृत्तपत्रे त्यानंतरच्या काही वर्षात निघाली. तसेच आज प्रकाशित होणाऱ्या अनेक वृत्तपत्रांना पन्नास , पंच्याहत्तर, शंभर वर्षाची प्रदीर्घ अशी परंपराही आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये वृत्तपत्रांची कामगिरी फार महत्त्वाची ठरलेली आहे. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांची सामाजिक, राजकीय, आर्थिक ,सांस्कृतिक, परिवर्तनात मोठी मदत झालेली आहे. आज राष्ट्रीय, प्रादेशिक ,जिल्हा, तालुका, शहरी पत्रांची संख्या भरपूर वाढलेली आहे. वृत्तपत्रांची लोकाभिमुखता मोठी आहे. अनेक मोठी सामाजिक कामे वृत्तपत्रांनी उभी केलेली आहेत तशीच त्यांना चालना दिलेली आहे.
आज २०२५ च्या पत्रकारितेची चर्चा करताना सर्व क्षेत्रातील प्रश्न वाढले आहेत ते तीव्रही होत आहेत. सर्वांगीण विषमता व दुरावस्था वाढते आहे. अशावेळी जनतेला व सरकारला मार्गदर्शन करण्याची भूमिका वृत्तपत्रांनी वठवली पाहिजे. चांगल्याचे स्वागत आणि नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचे धाडस वृत्तपत्रांनी दाखवण्याची गरज आहे. प्रबोधनाच्या प्रवासात सर्वात समर्थ हत्यार वृत्तपत्रेच असतात. लोकांचा छाप्यावर विश्वास असतो म्हणून वृत्तपत्रांची जबाबदारी मोठी आहे. पण अशाकाळात जर 'गोदी मीडिया' हा शब्द रूढ होत असेल तर ते भूषणावह नाही. असा शब्द रूढ का होतो याचा विचार करण्याची गरज आहे.आदर्श समाजाच्या उभारणीसाठी आदर्श पत्रकार व आदर्श वृत्तपत्रांची गरज असते. 'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ' हा आगरकरी आणि ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' हा असा जाब विचारणारा लोकमान्यांचा आवाज फार महत्त्वाचा आहे. तसे दिनबंधू पासून मूकनायक पर्यंतची महनीय परंपराही लक्षात घेतली पाहिजे. सामाजिक न्यायाची बाजू उचलून धरण्यासाठी सत्यशोधनाची नितांत गरज असते .'दर्पण 'चा वर्धापनदिन साजरा करत असताना आरसा जसे पारदर्शक काम करतो तशी पारदर्शकता पत्रकारितेत येण्याची गरज आहे. तसेच हा आरसा अधिक स्वच्छ होण्यासाठी वाचकांच्या पत्रव्यवहाराची जागा वृत्तपत्रांमध्ये वाढली पाहिजे. सत्य कथन, सत्य दर्शन हाच पत्रकार दिनाचा संदेश आहे.