प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com
प्रेस मीडिया लाईव्ह :
४ जानेवारी हा फ्रेंच शिक्षक आणि ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल
यांचा जन्मदिवस. ४ जानेवारी १८०९ रोजी त्यांचा जन्म पॅरिस जवळील कूपव्हे या गावी झाला. तर ६ जानेवारी १८५२ रोजी ते क्षयरोगाने कालवश झाले.(काही ठिकाणी त्यांच्या कालवश होण्याची तारीख २८ मार्च १८५२ अशीही दिली आहे.) ब्रेल तीन वर्षाचे असताना खेळताना त्यांच्याह डोळ्याला गंभीर दुखापत झाली. आणि त्यात त्यांना अंधत्व आले.मात्र अंध असूनही आपल्या बुद्धीकौशल्याच्या व स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी इतर मुलांबरोबर शालेय शिक्षण घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना पॅरिस येथील राष्ट्रीय अंधशिक्षण संस्थेत शिकण्यासाठी पालकांनी दाखल केले. तेथे ब्रेल यांनी विज्ञान आणि संगीत या विषयात विशेष प्राविण्य मिळवले आणि त्याच संस्थेत शिक्षक म्हणून काम करू लागले. ब्रेल हे पियानो,ऑर्गन आणि इतर काही वाद्ये अतिशय उत्तम वाजवत असत. काही काळ ऑर्गन वादक केले.
पॅरिसच्या राष्ट्रीय अंधशाळेत शिकत असतानाच त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी अंधांसाठी उपयुक्त ठरेल अशी एक लिपी तयार केली. ही लिपी अंधांसाठी एक फार मोठे वरदान ठरली. अंधांसाठी विशिष्ट पद्धतीने तयार केलेले उठावदार टिंबांची लिपी म्हणजे ब्रेल लिपी. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबाना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते. त्यापूर्वी फ्रान्समधील व्हॅलेंटाईन होई या अंधशिक्षकाला उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील असे दिसून आले होते.तर चार्ल्स बारबिआ या सैन्य अधिकाऱ्याने युद्धभूमीवर रात्रीच्या संदेशवहनासाठी एक लेखन पद्धती तयार केलेली होती.लुई ब्रेल याने या पद्धतीच्या आधारे एक लिपी विकसित केली. ती जगभर ब्रेल लिपी नावाने ओळखली जाऊ लागली. १९२९ मध्ये मेथड ऑफ रायटिंग वर्ड्स, म्युझिक अँड प्लेन सॉंग बाय मीनस ऑफ डॉट ( ठिपक्यांच्या सहाय्याने शब्द, संगीत व गीत लिहिण्याची पद्धती) हे पुस्तक लिहिलं. एका अर्थाने ब्रेल लिपीने अंधांच्या जीवनात प्रकाश पेरला.
ब्रेल लिपी ही भाषा नाही तर एक लेखन प्रणाली आहे. तसेच ती इतर युरोपियन लिपींप्रमाणे डावीकडून उजवीकडे वाचली जाते. ब्रेल लिपीमध्ये ६४ वर्ण असतात आणि प्रत्येक सहा-स्थित मॅट्रिक्समध्ये एक ते सहा उंचावलेले ठिपके असतात. ब्रेलच्या निधनानंतर जगातील काही प्रमुख व्यक्तीने त्याची पद्धती विकसित करण्याच्या ठरवले. १९६८ मध्ये डॉ.थॉमस आर्मीज यांच्या मार्गदर्शनात एक संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेने ब्रिटिश आणि परदेशी समाजात अंधांच्या साहित्याचा प्रसार केला. पुढे यातूनच ' रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर द ब्लाइंडस ' ची स्थापना झाली.ब्रेल लिपीमुळे अंध लोकांना वाचनाचा आनंद मिळू शकला.१९९० नंतर जगातील निरनिराळ्या भाषेत तिचा वापर होऊ लागला. अगदी वर्ल्ड बुक इनसायक्लोपीडिया सारखा १४५ खंडांचा ग्रंथही ब्रेल लिपीत आणण्यात आला.रोमन ब्रेल लिपीवरून भारतीय ब्रेल लिपीही तयार करण्यात आली. तिचे श्रेय अंधकल्याण संघाचे जेष्ठ संस्थापक कार्यकर्ते अल्पाइ वाला यांच्याकडे जाते. लुई ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!
गझलनवाझ पंडीत भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने २००६ साली ब्रेल लिपीत 'स्पर्शांकुर 'हा गझल संग्रह प्रकाशित केला होता. त्यात माझी ' खाचखळगे'गझल प्रकाशित झाली होती.ती पुढीलप्रमाणे.....
मार्गात नेहमीचे असतात खाचखळगे
खंबीर पावलांनी बुजतात खाचखळगे ...
आयुष्य कंठण्याचा इतका कशास बाऊ?
सांगा मला कुठे हे नसतात खाचखळगे?
विज्ञाननिष्ठ जगणे जेथे दिसून येते
तेथे परंपरांचे सरतात खाचखळगे...
केली फिकीर नाही मीही कधीच ज्याची
त्याचीच आज चर्चा करतात खाचखळगे...
चुकवित रोज त्यांना मी वाटचाल करता
मजलाच राजमार्गी म्हणतात खाचखळगे...
बाजूस चाललेल्या हेरून माणसांना
रस्त्यावरून गर्दी करतात खाचखळगे ...
अपुल्या कृतज्ञतेचे सांडून चार अश्रू
आपापलेच डोळे पुसतात खाचखळगे...
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे ‘सरचिटणीस’आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच नामवंत लेखक, वक्ता ,कवी,गझलकार आहेत.)