प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून गस्त घातली जाते. एखादी घटना घडल्यावर नागरिक पोलीस नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर दूरध्वनी करतात; परंतु काही वेळा जलद प्रतिसाद मिळत नाही. बीट मार्शल'ही घटनास्थळी पोचण्यास वेळ लागतो. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून बीट मार्शल यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 'कॉप २४' बीट मार्शलची नव्याने आखणी करण्यात येत आहे. ही यंत्रणा १५ फेब्रुवारीपासून कार्यान्वित होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. त्यात 'रस्त्यावरील गुन्हे' याचे प्रमाण अधिक आहे. महिलांची छेडछाड, दागिने चोरी, पादचारी ज्येष्ठ नागरिकांची लूट अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. गुंड टोळ्यांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड करणे, वाहनांना आगी लावणे, रस्त्यावर कोयते घेऊन दहशत माजवणे अशा घटना घडतात. अशा गुंडांना वठणीवर आणण्यासाठी 'कॉप २४ बीट मार्शल' यंत्रणा काम करेल. सर्व ३९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त पथक, 'कॉप २४'मध्ये ७२६ बीट मार्शल, त्यांना चारचाकी गाडीसह १२५ दुचाकींची सुविधा देण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले, ''कॉप २४' हे गुन्हे शाखेच्या अंतर्गत राहील. त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बीट मार्शल आधुनिक शस्त्रांसह सज्ज असून त्यांना 'बॉडी कॅमेरा'ही देण्यात येणार असून कारवाईचे चित्रीकरण करण्यात येईल.''