प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खुन, घरफोड्या, जबरी मारहाण तसेच संघटित गुन्हेगारांचे अड्डे बनलेल्या धायरी येथे स्वतंत्र पोलिस चौकीसाठी इमारत उभारण्यासाठी धायरी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.त्यासाठी धायरी गावातील खडक भागातील जागेची लवकरच साफसफाई करण्यात येणार आहे .चोहोबाजूंनी एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धायरी - सिंहगड रोड परिसरात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्यांचा धुडगूस सुरू आहे. रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या महिला मुलींची छेडछाड,खुन,चोऱ्या, घरफोड्या, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धायरी येथे स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षासह सर्वपक्षीय पदाधिकारी अनेक दिवसांपासून करत आहेत.पोलिस प्रशासनानेही धायरी पोलिस चौकी सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.नांदेडसिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल भोस यांची याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची नांदेड सिटी पोलिस ठाण्यात भेट घेतली.
गुन्हेगारांच्या वाढत्या हैदोसामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांत भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पक्षीय नागरिकांच्या पुढाकाराने पोलिस चौकीसाठी जागा उपलब्ध करून लोकसहभागातून चौकीसाठी इमारत उभारण्याचा निर्धार यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरीकांनी केला.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश प्रवक्ते राहुल पोकळे,माजी नगरसेविका अश्विनी पोकळे, भाजपचे संघटक किशोर पोकळे, मनसेचे वाहतूक विभाग शहर अध्यक्ष शिवाजीराव मते,शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) चे नेते निलेश गिरमे, शिवसेना ( उध्दव ठाकरे गट) चे नेते महेश पोकळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दमिष्टे, सुनिल भोसले, सोमनाथ रायकर, सोनाली पोकळे आदी उपस्थित होते.
----------------
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले गेल्या आठ वर्षांपासून धायरी गाव व परिसराची लोकसंख्या दहा पटीने वाढली आहे अनेक मोठ्या शिक्षण संस्थासह बँका,कंपन्या वाढल्याने गृहनिर्माण सोसायट्या, लोकवस्त्यांचे मोठे जाळे पसरले आहे. पुण्यासह राज्यातील सराईत गुन्हेगारांचे अड्डे धायरीत तयार झाले आहेत. त्यामुळे खुन, निघृण हत्यासह गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस विभागाला वेळोवेळी निवेदन दिली आहेत.
या पार्श्वभूमीवर काल शनिवारी (४) रात्री सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी धायरी येथे पोलिस चौकीसाठी लोकसहभागातून इमारत उभारण्याचा निर्धार केला