प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :बनावटी जीएसटी फर्म, बनावट आधार कार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून 54 कंपन्या स्थापन करून तब्बल 496.27 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी डायरोक्टारेट जनरल ऑफ जीएसटी विभागाने (डिग्गी) दिलेल्या तक्रारीवरून कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनेश कुमार (वय २६, रा.देवडा जालोर, राजस्थान) आणि विरेंद्र कुमार (वय २६, रा. मुर्तला गाला, बाडमेर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत डीजीजीआयचे पुणे विभागाचे विभागीय माहिती अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे.
डीजीजीआयने केलेल्या तपासात त्यांना सुरवातीला बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्डच्या आधारे बनावट जीएसटी नंबर घेऊन कंपन्या स्थापन झाल्याची माहिती मिळाली होती. या कंपन्या मार्फत गुड्स आणि सर्व्हीस पुरवत असल्याचे भासवले जात होते. डीजीजीआय विभागाला यामध्ये काही तरी मोठा घोटाळा असल्याचा संशय आला. गोवा स्थित तीन कंपन्या आर. के. इंटरप्रायझेस, एस. के. इंटरप्रायझेस आणि महालक्ष्मी इम्पॅक्ट या कंपन्यामार्फत जीएसटी चुकविला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तपासात ह्या बनावट कंपन्या व त्या संबंधीत कंपन्याचा जीएसटी एकाच ठिकाणहून म्हणजे राजस्थान येथून भरला गेल्याचे निदर्शनास आले.
अधिक तपासामध्ये ही फसवणूक दिनेश कुमार नावाच्या एका आरोपीकडून होत असल्याचे निदर्शनास आले. तो राहुल कुमार नावाने ह्या कंपन्या चालवत असल्याचे नंतर तपासात समोर आले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या अधिक तपासामध्ये त्याचा साथीदार विरेंद्र कुमार असल्याचे निदर्शनास आले. विरेंद्र हा कल्पेश कुमार नावाने बनावट कंपन्या चालवत असल्याचे निदर्शनास आले. अशा पध्दतीने त्यांनी तब्बल 54 बनावट कंपन्या स्थापन करून 496.27 कोटींचा कर बुडविला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर 2020 ते ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला असून गुन्ह्याचा तपास कोरेगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला करत आहेत .