एटीएम मधुन पैसे काढणाऱ्यांना "आप अपना सीधे तरीकीसे पीन नंबर बता नही तो जान से मार देगे" असे म्हणुन चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळी अटक.

 तब्बल १४७ एटीएम कार्ड जप्त पुणे ग्रामीण पोलीसांना यश.

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 पुणे :- पुणे हे सराईत गुन्हेगारांचा अड्डा झालेला दिसत आहे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालले आहे सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे आता गुन्हेगार एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून पीन नंबर घेऊन खात्यातील पैसे काढून लुटणार्‍या आंतरराज्य टोळीला पकडण्यात ग्रामीण पोलीस दलाला यश आले आहे. या टोळीतील तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये रोख, १४७ एटीएम कार्ड आणि स्वीफ्ट कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल माल जप्त केला आहे. 

समून रमजान (वय ३६, रा. घाघोट, पलवन, हरियाना), नसरुद्दीन नन्ने खान (वय ३०, रा. चिटाऊर्फ चिरचिटा ता. जि. बुलंद शहर, उत्तर प्रदेश), बादशाह इस्लाम खान (वय २४, रा. चिटा ऊर्फ चिरचिटा, ता. जि. बुलंद शहर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आदील सगीर खान (वय ३०, रा. चिरचिटा, बुलंद शहर, उत्तर प्रदेश) हा पळून गेला आहे. 

याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी  यांना १७ जानेवारी रोजी माहिती मिळाली, एक सशंयित सिल्व्हर रंगाची दिल्ली पासिंगची कार पुणे -सातारा महामार्गाने खेडशिवापूर मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहे. त्यानंतर गवळी यांनी खेड शिवापूर टोलनाका येथे नाकाबंदी लावली. दिल्ली पासिंगची संशयित कार आल्यावर पोलिसांनी ही कार अडवली. त्यातील चार जणांना ताब्यात घेत असताना एक जण पळून गेला. कारची झडती घेतली असता त्यात ५० हजार रुपयांचे पाचशे रुपयांचे एक बंडल तसेच वेगवेगळ्या बँकेची १४७ एटीएम कार्ड सापडली. त्यांची चौकशी सुरु असतानाच एक जण पोलीस ठाण्यात आले.

माधवराज सखाराम जल्लवाड (वय ५६, मुळ रा. मंगरुळ, ता. हिमायतनगर, जि. नांदेड, सध्या रा. केळवडे, ता. भोर) यांनी सांगितले की, १७ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजणेच्या सुमारास खेड शिवापूर येथील कोंढणपूर फाटा येथे अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. तेथे पेसे काढण्यासाठी गेलो असताना एटीएम बाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी चोरट्याने हातातील चाकूचा धाक दाखवून माझ्या खिशातील २ हजार रुपये जबरीने काढून घेतले. ‘‘एटीएम मे हमारे लोग है, उनको आप अपना एटीएम पिन नंबर बताओ अगर आपने एैसा नही किया तो आप को हम जान से मार देंगे’’ असा दम दिला.

त्यानंतर ते एटीएममध्ये जाऊन त्यांनी एटीएम चा पिन नंबर एटीएममध्ये उभ्या असलेल्यासमोर एटीएम पिन टाकून ५०० रुपये काढून स्वत:कडे ठेवले. एटीएममध्ये कार्ड तसेच ठेवून बाहेर निघून आलो. त्यानंतर काही वेळातच ते सर्व एका सिल्व्हर रंगाच्या दिल्ली पासिंग कारमधून निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने मी घरी गेलो असता माझ्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काहीतरी हातचलाखी करुन काढले आहेत. माधवराव जल्लवाड यांना ती सिल्व्हर कार दाखविल्यावर त्यांनी तीच असल्याचे ओळखले. तिघा संशयितांनी माधवराव जल्लवाड यांना लुबाडल्याची कबुली दिली.

आरोपी सराईत गुन्हेगार

समून रमजान याच्यावर उत्तर प्रदेशातील चंदहट पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे. नसरुद्दीन नन्ने याच्यावर २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगडमधील बन्नादेवी, उमा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे ३ गुन्हे दाखल आहेत. बादशाह खान यांच्यावर उत्तर प्रदेशातील गांधी पारखे पोलीस ठाण्यात २०१९ व अत्रौली पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी महाराष्ट्रासह अमरोहा, बुलंद शहर, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे ते सांगत आहेत.

चोरीची मोडस

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्यांना ते चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने एटीएम पीन माहिती करुन घेऊन नंतर त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेत. तसेच एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्यांना त्यांचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुरु असताना ते म्हणत, हे तुमचे बाकी आहे, असे म्हणून त्यांचे एटीएम पीन नंबर जाणून घेत. हातचलाखी करुन एटीएम कार्ड बदलत असत. उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क केल्यावर त्यांच्यावर आणखी काही गुन्हे आहेत का याची माहिती मिळू शकेल, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश् गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, अंबादास बुरटे, पोलीस हवालदार निकम, कोंढाळकर, खेंगरे, साळुंखे, शिंदे, नलावडे, कुंभार, भालेराव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post