जीवनशैलीत पर्यावरणप्रेम रुजावे : अदिती गुप्ता
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: पर्यावरण संवर्धन,जनजागरण क्षेत्रात कार्यरत 'तेर पॉलिसी सेंटर'(टेक्नॉलॉजी, एज्युकेशन,रिसर्च अँन्ड रिहॅबिलिटेशन फॉर द एनव्हायरमेंट)च्या वतीने आयोजित 'तेर ऑलिंपियाड' स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ टाटा मोटर्सच्या मनुष्यबळ विकास प्रमुख अदिती गुप्ता यांच्या हस्ते, टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे सहसरसंचालक रोहित सरोज, 'तेर पॉलिसी सेंटर' च्या संस्थापक डॉ.विनिता आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
दि.१५ जानेवारी २०२५ सकाळी ११ वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यंदाचे या स्पर्धेचे हे १० वे वर्ष होते.दौंड येथील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय शाळेला ग्रीन स्कुल पुरस्कार देण्यात आला.याच कार्यक्रमात किर्तीमालिनी ढमाले, डॉ.एस.एच.शेख या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.स्नेहा कऱ्हाडे यांनी आभार मानले.
या समारंभात बोलताना अदिती गुप्ता म्हणाल्या,'लहान वयात पर्यावरणप्रेमाचा समावेश आपल्या जीवनशैलीत केला जात आहे, त्यामुळे हा उपक्रम उल्लेखनीय आणि एकमेवाद्वितिय आहे. आजूबाजूला पर्यावरणाची हानी करणाऱ्या गोष्टी घडत असल्याने त्याचा दुष्परिणाम आपल्या पिढीपेक्षा पुढील पिढ्यांना अधिक भोगावे लागणार आहेत. त्याबाबत आपण जागरूक राहिले पाहिजे.टाटा परिवारातील सर्व कंपन्या सुरवातीपासूनच समाजोपयोगी उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असतात. पुढेही हा सहभाग,पाठिंबा राहिल'.
रोहित सरोज म्हणाले,'पर्यावरणविषयक स्पर्धेमध्ये सहभागी होणे हेच सन्मानजनक आहे. ज्ञानवृद्धी हा उद्देश त्यातून साध्य होतो.सतत १० वर्ष हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरणप्रेमाची दीक्षा देत आहे,ही महत्वाची गोष्ट आहे'.
' तेर पॉलिसी सेंटर 'च्या वतीने शिक्षण आणि जागरूकता विद्यार्थांमध्ये रुजविण्यासाठी गेली दहा वर्ष ' तेर ऑलिंपियाड ' स्पर्धचे आयोजन करण्यात येत आहे. 'टाटा मोटर्स ' यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाते. देशात २४ ठिकाणी जंगलसदृश वृक्षलागवड करण्यात आली आहे.दोन ठिकाणी फुलपाखरू उद्यान करण्यात आले आहे.हा प्रत्यक्ष कृतीचा प्रवास आहे',असे ' तेर पॉलिसी सेंटर ' च्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी सांगीतले.
पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी ' तेर पॉलिसी सेंटर ' ( टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अँन्ड रिहॅबिलिटेशन फॉर द एनव्हायर्नमेंट ) २००९ मध्ये ही संस्था स्थापन झाली. संस्थेचा तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन आणि पुनर्वसनाचा उपयोग करून शाश्वत भविष्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.
लाखो विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग
...................
पर्यावरणीय मुद्द्यांविषयी जागरूकता निर्माण करणारी पिढी तयार करण्याचे काम संस्थेमार्फत होत आहे. गेल्या १० वर्षात २४, ४४, ८१७ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
२०२४-२५ या वर्षासाठी ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धे च्या २ फेऱ्या घेतल्या जातात. प्रथम फेरीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतात. या फायनल राऊंड मध्ये कमीत कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडले जाते. या वर्षी ३, ३३, ८२४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थांना पेन ड्राईव्ह, स्मार्ट फोन, टॅबलेट संगणक , प्रशस्तीपत्रके अशी पारितोषिके देण्यात येतात. राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा ३ विभागात घेण्यात येते. यामधे ५ ते ९वी , दुसरा विभाग १० ते १२ आणि तिसरा विभाग पदवी पूर्व विद्यार्थी. या विद्यार्थ्यामथून टॉप ५, टॉप १० आणि टॉप ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांचाही गौरव करण्यात येतो. जे शिक्षक दुर्गम भागातीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना स्पर्धोला बसण्यास प्रोत्साहन देतात त्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच ज्या शाळेचे जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धत सहभागी होतात अशा शाळांनाही ' ग्रीन स्कुल अॅवार्ड ' ने गौरविण्यात येते.