प्रसिद्ध आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची हत्या

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर मंगळवारी (ता. 07 जानेवारी) चाकूने सपासप वार करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा बुधवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. तर मृत तरुणीच्या ओळखीतील तरुणानेच तिची हत्या केल्याची माहिती समोर आली असून पैशाच्या वादातून हा सर्व प्रकार घडला आहे. शुभदा कोदारे (वय वर्ष 28) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय वर्ष 30) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आणि शुभदा हे दोघेही पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस होते. कृष्णा हा लिपिक पदावर काम करत होता, तर शुभदा एक्झिक्युटिव्ह होती. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच मैत्रितून शुभदाने कृष्णाकडे पैशांची मदत मागितली. वडील आजारी असल्याने पैसे हवे असल्याचे म्हणत शुभदाने कृष्णाकडून पैसे घेतले. एकूण शुभदाने कृष्णाकडून चार लाख रुपये घेतल्याची माहिती तपासातून समोर आली. पण सतत पैसे मागणाऱ्या शुभदावर काही वेळाने कृष्णाला संशय आला त्यामुळे त्याने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचे त्याला समजले. ज्यामुळे राग अनावर झालेल्या कृष्णाने शुभदावर चाकूने सपासप वार केले.

आरोपी कृष्णा कनोजला शुभदाची कामावर येण्या-जाण्याची वेळ माहिती होती. शुभदाने आपल्यासोबत खोटे बोलून पैसे घेतले असल्याचा राग कृष्णाच्या डोक्यात गेला होता. याच रागातून त्याने मंगळवारी कामावर आलेल्या शुभदाला कंपनीच्या पार्किंगमध्ये गाठले आणि माझ्या पैशाचे तू काय केलेस, असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली. याबाबत ती काही बोलणार त्याच आधी त्याने तिच्यावर मोठ्या चाकूने सपासप वार केले. त्याने शुभदा हिच्या उजव्या हातावर, कोपरावर चार ते पाच वार करून तिला गंभीर जखमी केले. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने काढला असून या व्हिडीओमध्ये शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्याभोवती घिरट्या घालत होत्या. यावेळी आजुबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कृष्णाच्या हातातील भलामोठा सुरा पाहून कोणाची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. 

Post a Comment

Previous Post Next Post