प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या सन्मती बाल निकेतन, मांजरी,येथील मुलांनी आज एक आगळे - वेगळे असे “ पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ माई स्वच्छता अभियान ” राबवून परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. संस्थेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत, हातात खराटा घेऊन मुलांनी "माझा परिसर स्वच्छ ठेवणे, माझी जबाबदारी" हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणले.
“जानेवारी २०२५ पासून सुरू झालेले हे अभियान दर १५ दिवसांनी नियमितपणे राबवले जाईल.” या अभियानाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संस्थेचा हेतू आहे. अशी माहिती माईंच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांनी दिली.
या स्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी "माईंच्या लेकरांचा निश्चय आगळा, स्वच्छ ठेवणार परिसर सगळा!", "माईंची लेकरं एकदम भारी, परिसर सगळा स्वच्छ करी!", "जिथे स्वच्छता, तिथे आरोग्य!", "एक पाऊल स्वच्छतेकडे!" अशा घोषवाक्यांद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला: मुलांनी स्वच्छतेचा संदेश देत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. "स्वच्छ परिसर, निरोगी जीवन" या उद्देशाने राबविण्यात आलेले हे अभियान भविष्यातील अनेक उपक्रमांची सुरुवात ठरेल, अशी आशा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.