अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला टाळे ठोकण्यात आले , अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील भोर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे, आणि पालकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बँक ऑफ बडोदाने ३२ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार या महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. कॉलेजची इमारत आणि १४ हेक्टर क्षेत्र बँकेच्या ताब्यात गेले आहे.

बँकेने वसतीगृहातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढत सर्व मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. या कारवाईमुळे डिप्लोमा आणि डिग्री शाखांमधील एकूण १६५० विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या इंजिनिअरींग ॲड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या सहा शाखा, डिग्रीच्या पाच शाखा आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

१७ जानेवारी रोजी इंजिनिअरींगच्या परीक्षा कशा होणार ?यापुढे शिक्षण बंद होणार का? या विचारामुळे काही विद्यार्थी डोळ्यात अश्रू घेऊन हॉस्टेलच्या बाहेर पडले. २००९ पासून सुरू असलेल्या या महाविद्यालयात महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. सद्यस्थितीत ४ लाख १९ हजार स्वेअर फूटाचे बांधकाम असून कॉप्युटर व इतर साहित्य मिळून सुमारे १०० कोटींची मालमत्ता आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वडवाडी कॅपसमध्ये सध्या जमीन आणि कॉलेजच्या इमारती मिळून सुमारे १३२ कोटींची मालमत्ता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post