प्रेस मीडिया लाईव्ह :
अभिनेत्री ममता कुलकर्णी.आता गृहस्थाश्रम जीवनातून निवृत्त होऊन संतांचे जीवन जगणार आहे. शुक्रवारी भगवे कपडे परिधान करून ममता कुलकर्णी महाकुंभाच्या सेक्टर क्रमांक 16 मध्ये असलेल्या किन्नर आखाड्याच्या शिबिरात पोहोचल्या. त्यांचा येथे पट्टाभिषेक झाला . ममता कुलकर्णी यांच्या येण्याची बातमी कळताच नागरिकांची यावेळी मोठी गर्दी झाली होती. अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करून, ममता यांनी प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मध्ये किन्नर आखाड्यात संन्यासाची दीक्षा घेतली. त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी देऊन गौरवण्यात आले आहे.
किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी ममता यांनी संन्यासाची दीक्षा घेऊन संगमच्या काठावर पिंडदान केले. यासोबतच त्यांचे नावही आता बदलण्यात आले आहे. महामंडलेश्वर बनण्यासोबतच ममता कुलकर्णी ' श्री यमाई ममता नंद गिरी' या नावाने ओळखल्या जाणार आहेत.
ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यात पोहोचल्या तेव्हा स्वामी महेशद्रानंद गिरी देखील येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांनी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली.त्यांच्यासोबत जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी हेही उपस्थित होते. ममता कुलकर्णी यांनी आचार्य महामुदलेश्वर यांच्याशी महाकुंभाबद्दल चर्चा केली. त्यांनी महाकुंभमेळ्याचे कौतुक केले. व्यवस्था अतिशय उत्तम असल्याचे सांगितले. आखाड्यात जाऊन संतांचे आशीर्वादही घेतले. अभिनेत्रीने गंगेत स्नान केले.
दीक्षा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने म्हटले की, " माझे चाहते माझ्यावर नाराज आहेत. परंतु देवाची सेवा करण्यासारखे दुसरे काही पुण्याचे काम नाही. सर्वात महत्त्वाचे तेच आहे."