प्रेस मीडिया लाईव्ह :
माढा ता.२० एकविसाव्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटत असताना भौतिक जीवनातील सर्व प्रकारच्या वेगवान बदलांचे आपण साक्षीदार आणि लाभधारक आहोत.मात्र आजही स्त्री पुरुष समतेचा प्रश्न हा कळीचा मुद्दा म्हणून सामाजिक पातळीवर अग्रक्रमावरच आहे. याचे कारण आमच्या मानसिकतेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असताना आपल्या नैसर्गिक,अकृत्रिम बुध्दीची मशागत मात्र काही प्रश्नांवर आपण करत नाही. परंपरागत मानसिकता ठेऊन बदल घडत नसतो.बदलात परीवर्तन अपेक्षित असते. या परिवर्तनासाठी स्त्रियांनी न्यूनगंड सोडण्याप्रमाणेच पुरुषांनी अहंगंड सोडण्याची गरज आहे. स्त्री पुरूष समानता हे केवळ भावनिक नव्हे तर तो राजकिय, सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक , बौद्धिक पातळीवर सोडवण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून आणि कुटुंबाच्या लोकशाहीकरणापासून केली पाहिजे.तसेच मूळ मुद्दा आपल्या मेंदूवर चढलेली विषमतेची पुटं आपणच काढण्याची गरज आहे. तेच समतेच्या दिशेने जाणारे ते पहिले पाऊल असेल ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, माढा (जि. सोलापूर) येथे बोलत होते.महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने पाच दिवसीय कार्यशाळेचा समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर होते. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा.मीनाक्षी कुंभार यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, शेतीच्या शोधापासून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पाऊण शतकात सर्वांगीण परिवर्तनात महिलांची भागीदारी फार मोठी आहे. येथे अनेक शतके मातृसत्ताक समाजव्यवस्थेची परंपराही रूजलेली होती. मात्र आज ती उदात्त परंपरा सोडून स्त्रीविषयक संकुचित दृष्टिकोन जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे. स्त्रीचे वस्तूकरण केले जात आहे. अशावेळी स्त्रीकडे माणूस म्हणून बघण्याचा संस्कार रुजवण्याची गरज आहे. स्त्रीचा श्रमामध्ये ७० टक्के वाटा आहे.तर उत्पंनात १० आणि मालमत्तेत ७ टक्के वाटा आहे. गेल्या काही वर्षात स्त्रीकडे बाजारपेठेतील उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. सौंदर्यस्पर्धांचे बाजारीकरण ,माध्यमातील स्त्री दर्शन, स्त्रीभ्रूणहत्या असे अनेक प्रश्न विषमतेचे द्योतक आहेत. समतेचे प्रयत्न प्राचीन काळातही काही प्रमाणात झाले.अर्वाचीन काळात राजा राममोहन रॉय यांच्यापासून महात्मा फुले दांपत्यापर्यंत अनेकांनी स्त्रीविषयक समतावादी विचार मांडला. त्याचा अंगीकार करून आणि बदलत्या परिस्थितीत त्यात भर घातली तर खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता रुजू शकेल. सत्ता हस्तगत योजना आखून समतेचा प्रश्न सुटत नसतो. तो सोडविण्यासाठीची प्रखर इच्छाशक्ती दाखवावी लागते. भारतीय राज्यघटनेची स्त्री पुरुष समतेची काही कलमे आहेत. त्याचा योग्य पद्धतीने वापर होण्याची आणि आपला दृष्टीकोन व्यापक करण्याचीही गरज आहे.
प्राचार्य डॉ. सुनील हेळकर म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने पीएम उषा योजनेअंतर्गत महीला सक्षमीकरणाची पाच दिवसीय कार्यशाळा जाणीवपूर्वक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महिलांचे आरोग्य, महिलांचे कायदे, स्वसंरक्षण, महिलांचे मानसिक आरोग्य, विपश्यना, स्त्री पुरुष समानता यासह विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचा लाभ निश्चितच विद्यार्थिनी व महिला वर्गाला झाला. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण फार महत्वाचे असते. अशा कार्यशाळांचे व व्याख्यानांचे उपक्रम त्यासाठी उपयुक्त ठरत असतात. या कार्यक्रमास महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयतील विद्यार्थिनी व महिलावर्ग उपस्थित होता. प्रा .सुनील माने यांनी आभार मानले.प्रा.डॉ.वंदना कवितके यांनी सूत्रसंचालन केले.