प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : "बापास काळजाचा आधार होत गेली आईच संकटांना आधार होत गेली"..आईची महत्ता सांगणाऱ्या या गझलेसह विविध भावना व्यक्त करणाऱ्या आशयघन गझला गझलसाद समूहाचे ज्येष्ठ गझलकार डॉ. दयानंद न्यूटन काळे यांनी गझलसाद संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित "माझी गझलसाद" या कार्यक्रमात सादर केल्या.
'रक्तात भीम अमुच्या ह्रदयात भीम आहे
प्रत्येक घेतलेल्या श्वासात भीम आहे...
अशा प्रकारची भावना व्यक्त करत डॉ दयानंद काळेंनी आपल्या काव्य प्रवासाची सुरवात व गझल पर्यंतचा प्रवास या बाबतच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणापासूनचे सामाजिक वास्तव व त्यातून आलेले अनुभव सांगत त्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
'मी मौनाची किंकाळी दररोज ऐकतो आहे
मन चक्षूंना माझ्या या देहात वळवतो आहे..'
अशाप्रकारे स्वतः शी संवाद साधणा-या गझलही त्यांनी सादर केल्या.
आजचे वर्तमान मांडतांना राजकीय व सामाजिक वास्तव सांगणा-या गझलाही त्यांनी सादर केल्या.
'विकास वेडा लपून आहे
फरार प्रगती म्हणून आहे ...'
दळणार दुःख आहे छळणार दुःख आहे
येथे कुणी कुणाचे पुसणार दुःख आहे ?
असे सर्वकालीक सत्य सांगणा-या त्यांच्या गझलांनी श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले.
सुभाष नागेशकर यांच्या कलादालनात आयोजित या कार्यक्रमात "माझी गझलसाद" हा एकल गझल सादरीकरणाचा कार्यक्रमाचे सारीका पाटील यांनी प्रास्ताविक केले तसेच डॉ. दयानंद काळे यांचा परिचय करून दिला. सुरवातीला जमलेल्या गझलसादींचे गझल मुशायरा झाला,त्यात
'बोलणे परखडपणाने सोडवत नाही
याचसाठी मी कुणाला आवडत नाही,...
(सारीका पाटील)' शोक न मी मरण्याचा केला,फक्त गुन्हा जगण्याचा केला(हेमंत डांगे )भेट क्षणभर रोज व्हावी एवढे काहीच नाही ,गोष्ट दुनियेला कळावी एवढे काहीच नाही (जमीर शेरखान )गुंतुनी जरी स्वतःत राहतात माणसे ,हाक मारल्यास तीच धावतात माणसे (नरहर कुलकर्णी) आदींनी त्यांच्या उत्तमोत्तम गझल सादर केल्या. तसेच रमेश कुलकर्णी व बाळकृष्ण पाटील यांनीही आपल्या कविता सादर केल्या. सरदार काळे यांनी डॉ. काळेंच्या विस्मरणात गेलेली तरूण वयातील एक कविता व अनेक चारोळ्या सादर केल्या.
या कार्यक्रमास गझलसाद चे सदस्य , काळे कुटुंबीय, शांत शीतल, सुभाष नागेशकर, नियाज खान, संतोष अकोळकर, बृहस्पती शिंदे, मनिषा शिंदे व इतर काव्य रसिक उपस्थित होते.