प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथे नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारची कोणतीही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील नागरीकांनी सीपीआरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील कोणत्याही पोस्ट आणि बातमीवर विश्वास ठेऊ नये. तसेच या प्रकारच्या कोणत्याही व्यक्तिगत फसवणुकीला बळी पडू नये, अशी बाब निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासनाशी तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून रितसर तक्रार द्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे लिपीक व शिपाई पदाच्या नोकरीच्या अमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
शासकीय अथवा निमशासकीय सेवेमध्ये नियुक्तीबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये पदभरती करण्यात येते.
जिल्हा स्तरावरील वर्ग-3 व वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरताना महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयातील निर्देशानुसार संबंधित विभागाचा आकृतीबंध अंतिम झाल्यानंतर उक्त नमूद कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करुन जिल्हा निवड समितीमार्फत जाहिरात प्रसिध्दीअंती रिक्त पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येऊन विहित मुदतीत नोंदणीकृत परीक्षार्थी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील ऑनलाईन परीक्षा केंद्रावर नियुक्त कंपनीमार्फत कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येवून प्राप्त गुणांकनानुसार निवड यादी प्रसिध्द करुन उमेदवारास विहित पध्दतीचा अवलंब करुन रिक्त पदावर रितसर नियुक्ती देण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.