प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- दुचाकी गाडीची डिक्की उचकटून त्यातील 2 लाख 38 हजार चोरुन नेल्याची पोलिसात खोटी फिर्याद देणारा अमिर अब्दुलकादरी इनामदार (वय 25.रा.आराम कॉर्नर ,शिवाजी चौक कोल्हापुर) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यातील फिर्यादी याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात येऊन गुरुवार(दि.30) रोजी मी लक्ष्मीपुरी परिसरातील भाजी मार्केट येथे ससूरबागे जवळ माझी व्हेस्पा गाडी लावून लघुशंके साठी गेलो असता माझ्या गाडीची डिक्की उचकटून त्यातील 2 लाख 38 हजार रुपये कुणीतरी चोरुन नेल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना दिली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकसो ,अप्पर पोलीस अधीक्षक आणि शहर पोलिस उपअधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सायकर ,सहा.पोलिस निरीक्षक गायकवाड , पोलिस मंगेश माने आणि किशोर पवार घटना स्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज द्वारे पहाणी करून त्याच प्रमाणे आजू बाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस पथक तसेच डॉगस्कॉड ,फिंगर प्रिंट पथक यांना बोलावून तपास केला असता कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही.
पोलिसांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने शेअर मार्केट ट्रेडिग मध्ये मोठे नुकसान झाल्याने त्याच प्रमाणे मी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मित्रा कडुन घेतलेली उसनवारी परत देता येत नसल्याने मी माझ्या व्हेस्पा गाडीच्या डिक्कीतुन 2 लाख 38 हजार रुपये चोरीस गेल्याचा बनाव करून पैसे बुडविण्याच्या हेतुने पोलिसात फिर्याद देण्यासाठी आल्याचे सांगितले.मात्र माझ्या गाडीच्या डिकीतुन पैसे चोरीस गेले नसून फक्त मित्रा कडुन घेतलेल्या उधारी उसनवारी बुडविण्याच्या हेतुने पोलिसात खोटी माहिती दिल्याचे सांगितले. सदर घटना घडली नसल्याने पोलिस ठाण्यात खोटी माहिती दिल्याने पोलिसांनी अमिर इनामदार यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.