प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१३ नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ.तारा भवाळकर यांना काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने ' काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार ' प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते आणि जेष्ठ पत्रकार अरविंद गोखले ,अनंत बागाईतकर, ज्येष्ठ लेखक डॉ.अरुण गद्रे यांच्या उपस्थितीत सांगली येथे झालेल्या एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये इचलकरंजीत १९७४ साली झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मृती जागर समितीचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे व सर्व संयोजक समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले सन्मानचिन्ह डॉ.तारा भवाळकर यांना स्मृती जागर सोहळ्याचे निमंत्रण दिलीप शेंडे यांच्या हस्ते व दीपश्री शेंडे, प्रसाद कुलकर्णी व रोहित शिंगे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर सोहळ्याचा ग्रंथदिंडी पासून संगीत संध्या पर्यंत अतिशय शानदार समारंभ २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजीत राजवाडा येथे ज्येष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
संपन्न झाला होता. त्यावेळी डॉ. तारा भवाळकर यांची या स्मृती जागराच्या अभिनव उपक्रमाबाबत शुभेच्छा देणारी व गेल्या पन्नास वर्षाचा पट उलगडणारी एक चित्रफीत दाखवण्यात आलेली होती. तसेच १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात डॉ. भवाळकर या एका परिसंवादात वक्ता म्हणून सहभागी झालेले होत्या. त्याची आठवण या समारंभात स्मृती जागराचे निमंत्रक दिलीप शेंडे यांनी करून दिली. यावेळी अनेकानी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृती जागराच्या संकल्पनेचे आणि त्या सोहळ्याचे कौतुक केले.