प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाने १५ जानेवारी २०२५ रोजी छत्तिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक प्रबोधन चळवळीत हे मासिक मौलिक कामगिरी करत आले आहे.
गेल्या पस्तीस वर्षात या मासिकाने सामाजिक ,आर्थिक ,राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक,साहित्य अशा सर्व प्रकारची एकोणतीस हजारावर छापील पृष्ठांची सकस वैचारिक शिदोरी दिली आहे. २०२४ या वर्षांमध्ये या मासिकाने ९२८ पानांचा असा मजकूर वाचकांना दिलेला आहे. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांताराम गरुड हे पहिली बारा वर्षे या मासिकाचे संपादक होते तर गेली तेवीस वर्षे प्रसाद कुलकर्णी हे या मासिकाचे संपादक आहेत.राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यपातळीवरील घडामोडींचे विश्लेषण करणारे हे मासिक जिज्ञासू वाचकांना, कार्यकर्त्यांना ,अभ्यासकांना, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना, सजग नागरिकांना वाचनासाठी व संदर्भासाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेसाठी सामूहिक विचारधारेची व्याप्ती व परिघ वाढविणाऱ्या या मासिकाचे जिज्ञासू नागरिक बंधू-भगिनी,सार्वजनिक वाचनालये,महाविद्यालये व इतर संस्थांनी वर्गणीदार वाचक व्हावे. असे आवाहन या मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी आणि संपादक मंडळांने केले आहे.
प्रसाद कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,शहीद कॉ.गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता ' पासून प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या 'शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? 'पर्यंतच्या अनेक गाजलेल्या पुस्तिका प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकातूनच सर्वप्रथम प्रकाशित झाल्या आहेत. गेली पस्तीस वर्षे दर महिन्याच्या पंधरा तारखेला नियमितपणे हे मासिक प्रकाशित होते. भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान आणि तिचा सरनामा आज भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. तसेच तो एकूण सामाजिक, राजकीय चळवळीच्याही केंद्रस्थानी आलेला आहे. मात्र समाजवादी प्रबोधिनीने १९७७ सालापासून आणि या मासिकाने पहिल्या अंकापासून आपल्या मुख्य कार्यक्रमपत्रिकेवर हा विषय आणला व त्या पद्धतीचे लिखाण आणि जनजागरण केलेले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकावर एम.फिल व पी.एचडीही केली गेली आहे. तसेच अनेक विद्यापीठांच्या काही ज्ञानशाखानी या मासिकाचा समावेश संशोधन नियतकालिक गटात केलेला आहे. अनेक संशोधन लेखात, प्रबंधात ,ग्रंथात ,संदर्भसूचित या मासिकाचा आदराने उल्लेख केला जातो. अनेक लहान मोठी नियतकालिके या मासिकातील मजकूर पुनर्प्रकाशित करत असतात. हे स्पष्ट करुन अशा या मासिकाचे वर्गणीदार वाचक सर्वांनी व्हावे.त्यासाठी (९८५०८ ३०२९० ) या क्रमांकावर अथवा समाजवादी प्रबोधिनी ,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी (४१६११५)ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन केले.