प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.८ वृत्तपत्रातील पत्रलेखनातून मोठ्या प्रमाणात जनजागरण होत असते. प्रश्नांना वाचा फोडण्यापासून न्याय मिळण्यापर्यंत पत्रलेखनाचा उपयोग होत असतो.महिला व विद्यार्थीनीनी समाज घडवण्यासाठी व आपल्या आजूबाजूच्या घटना आणि समस्या याची निराकरण करण्यासाठी पत्रलेखनाचा प्रभावी वापर करावा असे मत वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अभिजीत पटवा यांनी श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे व्यक्त केले.ते महाविद्यालयाचा मराठी विभाग,
समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या वतीने आयोजित पत्रलेखन कार्यशाळेत 'वृत्तपत्रातील पत्रलेखन' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.बाबासाहेब दुधाळे होते. प्रसाद कुलकर्णी व पांडुरंग पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेच्या संयोजक प्रा. डॉ. प्रियंका कुंभार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अभिजीत पटवा म्हणाले , इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाने २००६ साली दिलेल्या पुरस्कारातुन आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली . पत्रलेखक संघाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज यशाची विविध शिखरे गाठू शकलो. पत्रलेखनातून कार्यकर्ता कसा घडतो याबाबत वेगवेगळी उदाहरणे सांगता येतील.एका कॉइन बॉक्सवरच्या वेळेच्या सेटिंगने सुरु झालेला हा प्रवास आज विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारिते बरोबरच स्वतःचे चॅनेल चालवण्यापर्यंत तसेच विविध संस्थांच्या सोबत कार्यरत राहण्यात झाला .महिलांच्या जीवनात चूल आणि मुल हा अविभाज्य भागच आहेच .पण ते करतानाही आजूबाजूच्या घटनेवर त्यांनी व्यक्त झाले पाहिजे.वृत्तपत्राचे वाचन करावे त्याचबरोबर संपादकीय लेख ,अग्रलेख यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात.आपल्या आजूबाजूच्या समस्या या बाबत आपले मत लिहीत राहावे.सोशल मीडियाचा वापर करून पत्रलेखन सुरू करावे. त्यानंतर तुमची पात्रता सिद्ध झाल्यानंतर आपोआप वृत्तपत्र तुम्हाला स्वीकारेल.महिलांविषक समस्यांबाबत प्रभावी लेखन करण्याची आज गरज आहे व त्यानुसार त्यासाठी पत्रलेखक संघटना नेहमी पाठीशी असेल असे आश्वासित करताना पुढील वर्षापर्यत दहा विद्यार्थीनी पत्रलेखक म्हणून तयार करण्याचे आवाहन मराठी भाषा विभागास केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे म्हणाले, विद्यार्थिनींनी भवताल टिपताना आपले डोळे, कान सजग ठेवण्याची गरज आहे. त्यातून वास्तवाला भिडण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये येऊ शकेल. त्या निर्भीडपणे व्यक्त होऊ शकतील. असे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून वृत्तपत्र लेखनाकडे पाहिले पाहिजे. या कार्यक्रमास मनोहर जोशी ,महेंद्र जाधव, विनोद जाधव, संजय भस्मे, दीपक पंडित यांच्यासह विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रा. प्रतिभा पैलवान यांनी आभार मानले. प्रा. शुभांगी नाकील यांनी सूत्रसंचालन केले.