प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने रुक्मिणी गारमेंटच्या सौ. राधा सुनिल खवरे यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मराठी पञकार दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण लायन्स क्लबच्या अध्यक्षा हेमा डाळ्या यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार डॉ.राहुल आवाडे ,माजी आमदार सुरेश हाळवणकर , महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे ,भाजपचे जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी येथील रुक्मिणी गारमेंटच्या सौ.राधा खवरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गारमेंट व्यवसाय सुरु केला.सुरुवातीला मास्कची कामे अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करुन दिली.त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे कुर्ता - पायजमा शिलाईचे काम करुन देण्याविषयी विविध ठिकाणाहून मागणी वाढत गेली.हे काम त्यांनी आव्हान म्हणून स्विकारतानाच दर्जा आणि गुणवत्तेत कधीच तडजोड न करता आपल्या सहकाऱ्यांच्या चांगल्या मदतीने अगदी वेळेत पूर्ण करुन दाखवले.त्यांच्या कुर्ता पायजमा उत्पादनाला आता केवळ जिल्ह्यातच नव्हेतर महाराष्ट्र आणि इतर राज्यातून देखील मोठी मागणी वाढू लागली आहे.
रुक्मिणी गारमेंट व्यवसायाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना रोजगार उपलब्ध झाला आहे.त्यामुळे अनेक महिला भगिनी आता आर्थिकदृष्ट्या सक्षम ,स्वावलंबी होऊन स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात कमालीच्या यशस्वी ठरु लागल्या आहेत.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच इचलकरंजी प्रेस क्लबने सौ.राधा खवरे यांची उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कारासाठी निवड केली होती.या पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ.राधा खवरे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देखील पुरस्कार देऊनसन्मानित करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे जल अभियंता सुभाष देशपांडे , जेष्ठ पत्रकार दयानंद लिपारे ,अजय काकडे ,संजय कुडाळकर , भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले ,इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयुर चिंदे , उपाध्यक्ष अरुण काशिद ,अरुण वडेकर यांच्यासह सदस्य , विविध मान्यवर व नागरिक उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.