प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.७ सजग, कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेने अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे काम जगभरात केले असल्याचा जाज्वल्य इतिहास आहे. आजच्या भवतालात कोलाहल अधिकच वाढला असताना पत्रकारितेची ही तेजोमय परंपरा कायम राहावी यासाठी तितक्याच तडफेने हे काम होण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी व्यक्त केले. इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, कॉमर्स , सायन्स महाविद्यालयातील मराठी विभाग, समाजवादी प्रबोधिनी व इचलकरंजी वृत्तपत्र लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त पत्रलेखन कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. यावेळी 'आजची पत्रकारिता' या विषयावर ते बोलत होते .अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एम. एस. मणेर होते. प्रसाद कुलकर्णी व पांडुरंग पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुभाष जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
दयानंद लिपारे पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांनी महाराष्ट्रात तर्कवादाची परंपरा निर्माण केली. भारतात पत्रकारितेचा इतिहास ही जाज्वल्य आहे. अलीकडे जगभरातील नेतृत्वात अहंमान्यता वाढीस लागलेली आहे. पत्रकारांवरील हल्ले, खून,अटक, दबाव यामुळे पत्रकारितेवर बंधने, निर्बंध आल्याने काटेरी वाटचाल बनली आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांचे आव्हान निर्माण झाले आहे. अशावेळी सशक्त, बाणेदार पत्रकारिता समाजाला अपेक्षित आहे. ते काम आजच्या पत्रकारितेने अधिक ताकतीने करणे गरजेचे आहे. पत्रकाराने प्रवाह पतीत होता कामा नये. शोध पत्रकारितेमध्ये मोठी ताकद असते. निर्भीडता व निष्पक्षता पत्रकारीता प्रगल्भ करत असते. दयानंद लिपारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये आजची पत्रकारिता या विषयावर आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय व राज्यपातळीवरील उदाहरणे देत प्रकाश टाकला.
यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी पत्रकारितेचा पाया वृत्तपत्र पत्रलेखनातून रचला जातो. समाजातील विविध घटनांवर मत व्यक्त करण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याने याचा महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी लाभ घेण्याची गरज व्यक्त केली. तर पांडुरंग पिसे यांनी याकामी वृत्तपत्र लेखक मदतीसाठी तत्पर असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मणेर यांनी आजच्या पत्रकारितेकडून अपेक्षित परिणाम याविषयी भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले.आभार प्रा. भारती कोळेकर यांनी मानले. यावेळी मनोहर जोशी, संजय भस्मे, महेंद्र जाधव, दीपक पंडित आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.