'एनडी' सर्वांगीण समतेच्या दिशेने नेणारे प्रगल्भ नेते होते - प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

हुपरी ता.२२ प्रा. डॉ. एन. डी.पाटील सर्वांगीण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणारे थोर कृतीशील प्रज्ञावंत नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून त्यांचा सक्रिय वावर होता. महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी, प्रबोधन, विज्ञानवादी विवेकवादी ,चळवळीचे ते नेते होते.शेतकऱ्यांचे, वंचितांचे , कष्टकऱ्यांचे सर्वहारा वर्गाचे ते तारणहार होते. त्यानी स्वीकारलेला प्रबोधनाचा व संघर्षाचा रस्ता सर्वांगीण समता प्रस्थापनेच्या दिशेने जाणारा होता. त्या मार्गावरून वाटचाल करणे आणि त्यांचे विचार,कार्य कृतिशीलपणे पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे महाविद्यालयात बोलत होते. महाविद्यालयाच्या व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कालवश प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. विजय पडळकर होते. मंचावर मानसिंग देसाई, शिवराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रा. एन. डी.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. बाळकृष्ण जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, एन.डी.सरांचे भाषण आणि लेखन हा एक एक अनमोल ठेवा आहे .त्यांच्या शब्दाशब्दातून प्रगल्भता, विद्वत्ता, चिंतनशीलता तसेच सामान्यांशी जोडलेली नाळ दिसत असे.त्यांनी असंख्य आंदोलने यशस्वी केली.असंख्य प्रश्न मार्गी लावले. त्यांचे नेतृत्व यशाची हमी देणारे होते.एन.डी.सरांना समाजाचा संसार करण्याची पूर्ण मोकळीक मिळालेली होती. याचे सर्व श्रेय अर्थातच त्यांच्या अर्धांगिनी सरोजताई ऊर्फ माईना द्यावे लागेल. एन.डी.या वादळाचा संसार माईंनी शिक्षिकेची नोकरी करत आणि सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडत समर्थपणे पेलला. प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी एन.डी.पाटील यांचे जीवन व कार्य याची विविध अंगाने उदाहरणांसहित मांडणी केली.

अध्यक्षस्थाना वरून बोलताना डॉ.विजय पडळकर म्हणाले, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे एन.डी.सरांचे वैशिष्ट्य होते. कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करण्याची त्यांची स्वतंत्र शैली होती.

आपल्या समस्येतून निश्चितपणे मार्ग काढू शकतील असा सर्वांना विश्वास त्यांच्याबद्दल वाटत असे. त्यांच्यासारखे दुसरे व्यक्तिमत्व वर्तमान महाराष्ट्रात नव्हते.या कार्यक्रमास महाविद्यालयातील अध्यापक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. देवल तुळशीकट्टी यांनी मानले. प्रा.डॉ.संध्या माने यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post