डॉ. तुषार निकाळजे
प्रेस मीडिया लाईव्ह :
परवा पहाटे आमच्या सोसायटीमध्ये मॉर्निंग वॉक करीत होतो. सूर्योदय झाला नव्हता. सोसायटीमधील स्ट्रीट लाईट चालू होत्या. त्यांचा लख्ख प्रकाश रस्त्यावर, झाडांवर व इमारतींवर पडला होता. रस्त्यावर फिरणाऱ्या मांजरीचे डोळे डायमंडसारखे चमकत होते. वॉकिंग करता करता माझी नजर आकाशाकडे गेली. नकळत मी जागीच थांबलो. आभाळाकडे टक लावून पाहू लागलो. कारण ते दृश्य विलोभनीय होते. पहाटेच्या गडद अंधारात स्ट्रीट लाईटचे बल्ब झळकत होते. सोसायटीतील एका इमारती शेजारी असलेल्या नारळाच्या झाडाच्या फांद्यांमधून चंद्र डोकावून पाहत होता. आजूबाजूच्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश त्या चंद्र दर्शनाने फिकट वाटू लागला होता. मी चटकन खिशातील मोबाईल काढला आणि क्षणार्धात तो क्षण कॅमे-यात टिपला. पुढची चार मिनिटे मी मागेपुढे करत त्या नारळाच्या झाडामागे असलेल्या चंद्राकडे पाहत होतो. मला मनातल्या मनात हसू आले, मी आनंदी झालो आणि पुन्हा चालू लागलो. या दृश्याने मनात खळबळ माजली. चंद्र तर रोजच उगवत असतो, पण आपण रोज या गोष्टी बारकाईने पाहत नाही किंवा चंद्रदर्शनाची अशी एखादी स्थिती क्वचितच पाहण्याचा योग आपणास येतो. माझ्या मनात चलबीचल चालू होती. मला निसर्गाचे वेगवेगळे खेळ आठवू लागले. इंद्रधनुष्य, मृगजळ, उल्कापात यांची आठवण झाली. पावसाळ्यातील इंद्रधनुष्याची आपण आठ महिने वाट पाहत असतो, मृगजळाचीदेखील उन्हाळ्यात आठवण होते, आकाशातील उल्कापात हा क्वचित प्रसंगी पाहण्यास मिळतो. पण तरीही याची आपण वाट पाहत असतो. त्या क्षणाचा अनुभव हा काही वेगळाच आनंद देणारा असतो. मृगजळ असो, इंद्रधनुष्य असो किंवा उल्कापात हे आपणास मिळणार नाही, याची शास्वती असतानाही आपण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तो आनंदाचा क्षण मनाला सुखावणारा असतो. यांची एक झलक पाहण्यासाठी डोळे आतुरलेले असतात. असले क्षण एका झटक्यात बटन दाबून किंवा संगणक - सॉफ्टवेअरवर क्लिक करून तयार करणारे मोबाईल- कॉम्प्युटर यांना देखील यश आलेले नाही. सध्याच्या तांत्रिक युगात आपणास हवी असलेली किंवा अपेक्षित माहिती संगणक, सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता यांद्वारे सहज मिळू शकते. परंतु निसर्गाने निर्माण केलेले विलोभनीय क्षण हे फक्त निसर्गाची सिस्टीमस करू शकते .
माझे सकाळचे मॉर्निंग वॉक एव्हाना संपले होते. मी घरी आलो, बूट- सॉक्स- कपडे बदलले, हात धुतले, किचन मधील गॅस पेटवला, त्यावर चहा केला. गॅसवरील चहा उकळत असताना दारावरील बेल वाजली, दार उघडले, वर्तमानपत्रवाला होता. मी त्याच्याकडून वर्तमानपत्र घेतले व टेबलवर ठेवले. टीव्ही ऑन करून बातम्या लावल्या, पुन्हा किचन मध्ये गेलो. गॅस बंद केला, कपामध्ये चहा ओतून घेतला, लिविंग रूम मधील सोफ्यावर वर्तमानपत्र उघडून वाचत बसलो. कपातील गरम चहाचा घोट घेत वर्तमानपत्रातील बातम्यांवर नजर फिरू लागली. आर्थिक घोटाळा, लाच घेताना अधिकाऱ्याला अटक, रस्त्यावरील खड्ड्यात स्कूटर वरील वाहन चालक पडून जखमी, ट्राफिक जाम, अपात्र अधिकाऱ्याला क्षमापित, मोकाट फिरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?, अपहरण, जमिनीच्या वादातून हाणामारी, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यापेक्षा बांधकाम व हेरिटेज वॉल तयार करण्यावर खर्चास प्राधान्य, महागाई वाढ, बेरोजगारी, अधिकार मंडळांच्या सभेमध्ये वात्रटिका- कविता वाचन करून एकमेकांवर चिखल फेक चौकशी समितीचा अहवाल सादर होऊ नये दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? , कोणाचे हात कोणाच्या हाताखाली अडकले, सगळे एकाच माळ्याचे मणी, वर्धापन दिनानिमित्त पुरस्कारांसाठी वशिलेबाजी, दोन वर्षे उलटूनही पूर्ण वेळ कारभारी नाही, कार्यालय प्रमुखांची खुर्ची डळमळीत, रिमोट कंट्रोल कोण?अशा विविध हेडलाईन्स आणि विषयावरील बातम्या वर्तमानपत्रात पहावयास मिळाल्या. वर्तमानपत्र वाचत असतना टीव्ही वरील बातम्यांकडे अधून मधून लक्ष देत होतो. तेथे देखील अशाच प्रकारच्या बातम्या पहावयास मिळत होत्या. पहाटे वॉकिंग करताना पाहिलेली निसर्गाची सिस्टीम, वर्तमानपत्रातील व टीव्हीवरील बातम्यांमधील सिस्टीम याचं गणित मला समजेना. थोड्यावेळाने वर्तमानपत्र बंद करून ठेवले, टीव्ही बंद केले, ऑफिसला जाण्याची तयारी करू लागलो. मुलांचे शिक्षण, लग्न, फ्लॅटचा हप्ता, म्हातारपणी थोडे आर्थिक सेव्हींग या घरगुती सिस्टीमचा आपल्या स्वतःलाच विचार करायला हवा, असा विचार मनात येऊन गेला. आंघोळ उरकली. तोपर्यंत पत्नीने जेवणाचा डबा व नाश्ता तयार केला होता. मी नाश्ता केला कपडे- बूट घातले, डबा व पाण्याची वाटली घेतली. पत्नी देखील तिला ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. पाण्याची बाटली- जेवणाचा डबा मी बॅगेत भरला, डोक्याला रुमाल बांधून त्यावर हेल्मेट घातले, जिना उतरून कॉमन पार्किंग मधील स्कूटर काढून स्टार्ट केली, दहा-पंधरा फूट स्कूटर वरून पुढे गेल्यानंतर माझे हेल्मेटच्या काचेतून आकाशाकडे लक्ष गेले. पहाटे चंद्राने नारळाच्या झाडाच्या फांद्यांमधून दाखवलेली झलक आता दिसत नव्हती. मी स्कूटरचा एक्सीलेटर वाढवला आणि ऑफिसच्या दिशेने प्रस्थान केले.