सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेतले होते, तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या. या सर्व आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून वातावरण तापले असून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधीक्षकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वाल्मीक कराडबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सीआयडीकडून चौकशी सुरू असलेल्या ज्योती जाधव ही महिला वाल्मीक कराडची दुसरी पत्नी असल्याचा खळबळजनक दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास उशीर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता धनंजय देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे चर्चांना उधाण आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत. सीआयडीच्या अधिकार्यांनी सोमवारी दुपारनंतर ज्योती जाधव यांची चार तास चौकशी केली. धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीनंतर वाल्मीक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. ज्योती जाधव ही वाल्मीक कराड याची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला. तसेच वाल्मीक कराड सुरुवातीच्या दिवसांत तिच्याकडे राहायला असल्याचा दावा केला जात आहे.
कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली
दुसरीकडे सीआयडीकडून या प्रकरण खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मीक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली असल्याची बातमी आहे. त्यासोबतच वाल्मीक कराडची आणखी कोणत्या बँकेत खाती आहेत, याचाही शोध सुरु आहे. या जप्ती संदर्भातील पत्र सीआयडीकडून उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.
कोण आहे वाल्मिक कराड?
वाल्मिक कराड हा परळी नगरपरिषदेचा माजी नगराध्यक्ष असून मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांपासून तो परळी मतदारसंघाचे राजकीय व्यवस्थापन सांभाळत आहे. धनंजय मुंडे यांनी राजकारण सुरू केल्यापासून वाल्मिक कराड सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत आहे. कराड हा जिल्ह्याच्या सर्व शासकीय व सामाजिक कार्यक्रमांवर देखरेख करत आहे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अशाच पद्धतीने तो जिल्ह्याचा कारभार चालवत असत. वाल्मिक कराडवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.