प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, त्यांचा मृतदेह शिंदवणे (ता. हवेली) घाटात सोमवारी (दि. 9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सापडला आहे.आमदार टिळेकरांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण करण्यात आल्याची माहिती आज दुपारी समोर आली होती. आज ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सतिष वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. तेव्हा एक चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा त्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, वाघ यांचा मृतदेह यवत गावाच्या हद्दीत सापडला. ग्रामीण पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांना दिली. यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्री उशिरा हडपसर पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस पथकांना मार्गदर्शन केले. तर अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे सकाळपासून हडपसर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
आर्थिक वाद की आणखी काही कारण; तपास सुरू
वाघ यांची मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता असून त्यांचा हॉटेलचाही व्यवसाय आहे. ज्या हॉटेलपासून त्यांचे अपहरण झाले ते त्यांनी भाड्याने चालवायला दिले होते. त्यांनी अनेक गाळेही भाड्याने दिले आहेत. सध्या ते शेती करत असून संपत्तीच्या वादातून अपहरण झाले की इतर काही कारणातून अपहरण झाले याचा पोलीस तपास करीत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मामाचेच अपहरण होऊन खून झाल्यामुळे पोलिसांनी घटना गांभीर्याने घेतली आहे.
अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा खून करून मृतदेह यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना केली आहेत, असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.