स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शाहुनगर येथुन मंगळवार (दि.03) रोजी पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष सुरेश माळी (वय 33)आणि प्रथमेश सतीश शिंगे (वय 25.रा.दोघे नवीन वसाहत यादवनगर ) यांना ताब्यात घेऊन अवघ्या बारा तासात छडा लावून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष सुरेश माळी हा दारुच्या व्यसनाधीन असल्याने त्याची पत्नी एक वर्षा पूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळुन सोडून गेली होती.ती सापडत नसल्याने संतोष माळी याला तिची बहिण सौ.नकुशा कुमार चव्हाण यांनी आणि तिच्या घरातील नातेवाईकांनी तिला लपवून ठेऊन आणि पळुन जाण्यास मदत केल्याचा संशय होता.या कारणातुन संतोष माळी आणि त्याच्या साथीदाराने मंगळवार (दि.03) रोजी साडेतीनच्या सुमारास शाहुनगर ,राजारामपुरी येथून नकुशा चव्हाण हिची पाच वर्षांची मुलगी हिसकावून घेऊन मोटारसायकल वरुन गेल्याची घटना घडली.याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी संतोष माळी आणि त्याच्या साथीदारावर अपहरणचा गुन्हा दाखल केला.
अपहरण केलेल्या मुलीच्या आईला फोन करून आरोपी संतोष माळी याने माझ्या पत्नीला माझ्या समोर हजर करा नाहीतर मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याने आणि दिवसा ढ़वळ्या हा अपहरणाचा प्रकार घडल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला आरोपींचा शोध घेऊन मुलीची सुटका करण्याच्या सूचना दिल्या.
या पथकातील पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास चालू केला पण त्यांचा फोन बंद होता.त्यामुळे हे नेमके कुठे आहेत याची माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीकडे चौकशी करीत असताना या पथकातील पोलिसांना आरोपी संतोष माळी याने त्याच्या साथीदाराला तवंदी घाटात सोडून संतोष हा मुलीला घेऊन निपाणीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली.तपास पथकातील पोलिसांनी तात्काळ तवंदी घाट येथे जाऊन प्रथमेश शिंगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता संतोष हा निपाणी येथे अर्जुननगर येथे असल्याची माहिती मिळाली असता तात्काळ त्या ठिकाणी जाऊन संतोष माळी याला मुलीसह ताब्यात घेऊन गुन्हयांत वापरलेली मोटारसायकल ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
दोघां आरोपींना पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आरोपी संतोष माळी याच्यावर राजारामपुरी ,राधानगरी आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.तर प्रथमेश शिंगे याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस वैभव पाटील,गजानन गुरव ,कृष्णात पिंगळे,प्रविण पाटील यांच्यासह आदीने केली.