' शो-मॅन 'ची जन्म शताब्दी


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

हिंदी चित्रपट सृष्टीतील ग्रेट ' शो-मॅन ' अशी ओळख असणारे आणि चित्रपटांना भव्यता प्रदान करणारे , देशविदेशात प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांची १४ डिसेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दी आहे. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि आई रामसरणी देवी हे राज यांच्या बालपणीच सहकुटुंब मुंबईत वास्तव्यास आले. राज यांचे मूळ नाव रणवीर होते. राज कपूर यांना शम्मी व शशी हे दोन भाऊ तसेच उर्मिला ही एक बहीण होती. राज कपूर यांचे शिक्षण डेहराडून कलकत्ता व मुंबई येथे झाले होते. शम्मी कपूर व शशी कपूर हेही पुढे नामवंत अभिनेते बनले.


१९३५ साली राज कपूर यांनी ' इन्कलाब 'या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. गौरी, वाल्मिकी आदि चित्रपटही त्यांनी केले. त्यानंतर केदार शर्मा दिग्दर्शित' नीलकमल' या चित्रपटापासून त्यांनी रणवीर ऐवजी राज हे नाव लावण्यास सुरुवात केली. ' नीलकमल 'हा राजकपूर आणि मधुबाला यांचा नायक नायिका म्हणून हा पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटात नास्तिक शिल्पकाराची भूमिका राज कपूर यांनी केली होती. तर राजकन्या असूनही अस्पृश्य घरात वाढलेल्या कमलाची भूमिका मधुबालाने केली होती. तर तिच्या बहिणीची भूमिका त्याकाळची विख्यात अभिनेत्री बेगम पारा हीने केली होती. प्रेमाच्या त्रिकोणाची काव्यात्मक मांडणी करणारा हा महत्वाचा चित्रपट होता.


१९४६  कृष्णा यांच्याशी राज यांचा विवाह झाला. ते आपल्या पत्नीला नेहमी कृष्णाजी म्हणून हाक मारत असत.या दाम्पत्याला रणधीर, ऋषी आणि राजीव , रीमा व रीतू अशी पाच आपत्ये होती. त्यांचे तिन्ही पुत्र चित्रपटसृष्टी अभिनेते झाले. डब्बु, चिंटू आणि चिम्पू ही त्यांची टोपण नावे होती.राज कपूर यांनी बॉम्बे टॉकीज ,रणजी स्टुडिओ येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर आपल्या वयाच्या अवघ्या विशीत ' आर. के.फिल्मस 'या कंपनीची स्थापना केली.  याच काळात म्हणजे १९४७ साली सत्यजित रॉय यांनी चिदानंद दासगुप्ता यांच्या सहकार्याने कोलकत्ता फिल्म सोसायटी या संस्थेची स्थापना करून भारतात फिल्म सोसायटी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. आर. के. फिल्मस कंपनीच्या वतीने १९४८ साली आलेल्या'आग' या पहिल्याच  चित्रपटात राज कपूर यांनी अभिनय ,दिग्दर्शन यातील अस्सलतेची चुणूक दाखवली. एका कलासक्त मनस्वी तरुणाची कहाणी यातून त्यांनी साकार केली. त्या काळात या चित्रपटाचा निर्मिती खर्च साडेतीन लाख रुपये होता.


 त्यानंतर पाठोपाठ आलेल्या १९४९ सालच्या ' बरसात 'या चित्रपटाने त्यांना मोठा लौकिक मिळवून दिला. ती एक भावनाप्रधान प्रेमकहाणी होती.या चित्रपटातील सुरेल संगीत, चित्रणातील कलात्मकता याद्वारे पडद्यावर उत्तमरित्या साकारलेले प्रेमकाव्य रसिकांना फार भावले. या चित्रपटाबाबतची एक आठवण राज कपूर यांचे चरित्रकार बनी रुबेन यांनी राज यांच्या चरित्रात लिहिली आहे. ती अशी 'बरसातच्या चित्रीकरणासाठी काश्मीरला जाऊन तिथे बराच काळ मुक्काम करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा नर्गिस यांच्या आईने मुलीला तिथे पाठवायचे नाकारले. अखेर राज यांना तडजोड करावी लागली. बरसात मधील नर्गिस बरोबरच्या महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रीकरण त्यांनी महाबळेश्वरला करायचे ठरवले. त्या घटनेसंबंधी बोलताना विश्व मेहरा म्हणतात,' मग आम्ही नंतर काही दिवसांनी काश्मीरचे निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी स्वतंत्रपणे काश्मीरला गेलो. राजने अतिकुशलतेने ती दृष्ये आधी चित्रित केलेल्या  फिल्मच्या वेगवेगळ्या भागात गुंफून टाकली. राजने हे इतक्या सफाईने केले की ,आजही या देशातील कोट्यावधी प्रेक्षकांना बरसातचे चित्रीकरण काश्मीरला न होता महाबळेश्वरला झालं होतं हे माहित नाही.' त्यानंतर दोन-तीन दशके राज कपूर नावाचे गरुड हिंदी चित्रपट सृष्टीवर आपला ठसा उमटवित राहिले.


१९५१ सालच्या ' आवारा ' आणि 'श्री ४२०' या त्यांच्या चित्रपटांनी काल्पनिकता आणि सत्य हे मोठ्या कलात्मक पद्धतीने उभे केले. आवारामुळे हिंदी चित्रपट सृष्टीच्या कक्षा रुंदावल्या आणि निर्मितीत एक प्रकारची भव्यता आली . या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली. या चित्रपटातील 'आवारा हू  ' हे गाणं रशिया,चीन, इजराइल, मलाया, झेकोस्लाव्हाकिया, इराण ,वेस्टइंडीज, पूर्व आफ्रिका 

सह अनेक देशात लोकप्रिय ठरल.सोव्हिएत सरकारने राज कपूर यांना खास निमंत्रण देऊन रशियाला सन्मानाने बोलावले व त्यांचा गौरव केला. आवारा चित्रपटातील त्यांची भूमिका २००५ साली टाईम मासिकाने ' जागतिक चित्रपटातील सर्वकालिक टॉप टेन परफॉर्मन्स ' म्हणून गौरवली होती.हे चित्रपट हिंदी चित्रपट रसिकांच्या समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरले.आवारा चित्रपटाने 'नाही रे 'वर्गातील जनसामान्यांचे दर्शन घडवलं. नेहरूंना अभिप्रेत असलेल्या समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटापैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. एकीकडे वर्ग विग्रहाचे वास्तव आणि दुसरीकडे आशेचा किरण या चित्रपटाने दाखवून दिला. ही कथा अतिनाट्यात्मक असली तरी ती सादरीकरणाच्या सहजतेने अतिशय नैसर्गिक वाटते. तसेच या चित्रपटामुळे उच्च निर्मिती मूल्याचे महत्व अधोरेखित झालं.


'श्री ४२० 'मधूनही त्यांनी कल्पना,वास्तव आणि प्रबोधन यांचे अफलातून मिश्रण करून एक व्यावसायिक रंजक चित्रपट तयार केला. एका भणंग नायकाची प्रतिमा पडद्यावर ठळकपणे मांडली. चार्लीच्याह ट्रम्प  पासून प्रेरणा घेतलेला भारतीय अवतार राज कपूर ने इथे साकार केला होता. 'मेरा जूता है जपानी, ये पतलून है इंग्लिस्तानी , सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी 'असं गाणाऱ्या राजूला रसिकांनी डोक्यावर घेतलं. तसेच कामगार वस्तीच्या सेटवर ' दिल का हाल सुने  दिलवाला 'या लोकगीताचे चित्रण केलं.यामध्येही नवभारत नेहरू युगामध्ये ऋषी समाजवादाचा स्वीकार करेल याच सूचन होतं. या चित्रपटाचे लेखक के.ए.अब्बास हे डाव्या विचारांचे होते. त्यांनी या चित्रपटातून भ्रष्ट उद्योजकवर्ग आणि सामान्य माणूस यांच्यातील भेदाचे निकोप दर्शन घडवून आणले. आणि समाजवादच किती उपयुक्त आहे याची मांडणी केली. या काळात सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा अतिशय निरागस, भोळा भाबडा , निष्पाप,निष्कपट असलेला' राजू' रसिकांना भावला. त्याने तरुणवर्गाच्या भावविश्वात स्वतःची जागा निर्माण केली. त्यांनी चित्रपटातून मांडलेला सामाजिक आशय फार प्रभावी ठरला. इजरायल मधील एका उपहारगृहाचे नाव या चित्रपटातील गाण्यावरून ' इचक दाना ' असे ठेवले होते. यावरून राज कपूर यांच्या लोकप्रियतेची कल्पना येईल.जगप्रसिद्ध अभिनेते चार्ली चॅपलीन यांचा प्रभाव राज यांच्या काही भूमिकांमधून दिसून येतो. 


पन्नासच्या दशकात एका बाजूला सत्यजित रॉय वास्तववादी पद्धतीने ' पथेर पांचाली' सारखा वास्तववादी चित्रपट परिणामकारकरीत्या चित्रित करत होते. तर दुसरीकडे राज कपूर तोच आशय व्यावसायिकता,रंजकता या माध्यमातून आणत होते. ब्रिटिशांच्या जोखाड्यातून प्रदीर्घ आयुष्य स्वातंत्र्यलढा देऊन भारत नुकता स्वतंत्र झालेला होता. देशाच्या संविधानाची उभारणी सुरू होती. याच दरम्यान त्यांनी' बूट पॉलिश ' आणि 'जागते रहो ' या कलात्मक चित्रपटांचीही निर्मिती केली. जागते रहो चित्रपट शंभू मित्र यांनी दिग्दर्शित केला होता. राज कपूर यांनी त्याला निर्मिती सहाय्य करून त्यात भूमिकाही केली होती. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. प्रयोगशील कथन पद्धती आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रण यामुळे या चित्रपटाचे आजही एक आगळे महत्त्व आहे.


राज कपूर यांच्या कार्यकर्तुत्वाची उंची पहिल्या दहा-पंधरा वर्षातच सर्वांना कळून चुकली होती. त्या काळातील ख्यातनाम चित्रपट समीक्षक कविता सरदार यांनी २ ऑक्टोबर १९६० च्या' माधुरी 'अंकात लिहिले होते,'गेल्या दोन दशकात हिंदी सिनेमांमध्ये प्रशंसनीय आगर दीर्घकाळ स्मरणात राहण्यासारखे टिकाऊ असे फारसे काही दिसत नाही.या क्षणभंगुर चित्रनिर्मितीच्या पलीकडे जाऊन नवीन काही करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी राज कपूर हे एक आहेत . वरवर पाहता भारतीय सिनेमात त्यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवते हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.एखाद्या चिल्लर गल्लाभरू सिनेमाच्या चर्चेत त्यांचे जेवढे नाव असते ,तितकेच एखाद्या जबाबदार अभिरुचीपूर्ण निर्मितीमध्ये असते. एक अत्यंत चोखंडदळ चित्रनिर्मिती आणि आश्चर्य वाटण्याइतके तिकीट विक्री उच्चांक या दोघांचाही अनुभव त्यांनी घेतला आहे. या प्रक्रियेतच त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची उंची इतकी वाढत गेली, की ती चित्रपटसृष्टीत अजोड ठरली. चित्रपट व्यवसायातील त्यांच्या या दुहेरी प्रवृत्तीमुळे त्यांना एक साधारण महत्त्व आले. इतकेच नव्हे तर चित्रपटसृष्टीकडे पाहण्याच्या त्यांच्या या दृष्टिकोनामुळे कुंठित झालेल्या हिंदी सिनेमाला एक प्रकारची मोकळीकही लाभली.'


राज कपूर यांचे चरित्रकार बनी रूबेन यांनी म्हटले आहे, "राज यांचे खरे, उत्कट, त्याला बांधून ठेवणारे चिरकालीन प्रेम त्याच्या चित्रनिर्मितीवर आहे. त्याच्यापुढे इतर सर्व गोष्टी त्याच्या लेखी दुय्यम आहेत... त्याचे हे प्रेम ,त्यामागील उत्कटता ,स्वतः स्वीकारलेल्या माध्यमावरची त्याची निष्ठा यामुळे सर्वत्र त्याची प्रशंसा होत असतेच ,पण सौंदर्य ,अदभुता, जादू यांच्याबरोबर चित्रपटमाध्यमाची ताकद वाढवण्याचे त्याचे जे प्रयत्न असतात त्यांना आजूबाजूंच्याचे उत्स्फूर्त सहकार्य लाभते. पण माझ्या मते त्याला आणखीही एक कारण आहे. राज कपूरची बॉक्स ऑफिस वरची पकड ,लोकांना काय आवडेल याची अंत:स्फूर्तीने त्याला होणारी जाणीव ,कथा सूत्रामध्ये हलकेच मधुर गाणी गुंफण्याचे त्याचे कसब ,लोकांवरंजन करीत असताना त्यांना वाईट अभिरुची पासून दूर ठेवण्याचे त्याचे प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे तो आणि त्याचे चित्रपट विचार प्रसारणाच्या दृष्टीने असाधारण सामर्थ्यवान बनले आहेत.त्याचे मला महत्त्वाचे वाटणारे वैशिष्ट्य म्हणजे विचारवंत म्हणून ख्याती नसतानाही त्याच्या डोक्यात सतत धो धो वाहणाऱ्या कल्पना.शिवाय दुसऱ्यांने काही सुचवले तर तेही ग्रहण करण्याची त्याची ताकद. सामान्य माणसाबद्दल त्याला असलेल्या उपजत कणवेमुळे त्याचे सामाजिक विचार प्रागतिक होते. आणि त्याच्या चित्रपटाच्या लोकप्रियतेला बाधा येणार नाही अशा रीतीने ते विचार आणि मानवतावादी आदर्श त्याच्या चित्रपटातून समाजा पुढे ठेवलेही जात होते.'


चित्रपट निर्मिती करतांना राज कपूर यांनी संकलनासह इतर तांत्रिक अंगानाही अग्रक्रमाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एक वेगळी तांत्रिक समृद्धी त्यांनी हिंदी चित्रपटांना दिली. छायाचित्रकार राघू करमाकर, संगीतकार शंकर जयकिसन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, पटकथाकार के. ए . अब्बास, कथाकार वसंत साठे,

 आणि पार्श्वगायक मुकेश यांच्या साथीने त्यांनी चित्रपट माध्यमाच्या प्रत्येक घटकात समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला. तो अतिशय यशस्वी झाला. (गीतकार शैलेंद्र ३० ऑगस्ट १९२३ रोजी जन्मले होता तर राज कपूर यांच्या वाढदिवसा दिवशीच म्हणजे १४ डिसेंबर  १९६६ रोजी कालवश झाले.) आर .के.फिल्मस मध्ये राज यांना वरील मंडळीप्रमाणे के. व्ही.एस.रामन,ओमप्रकाश मेहरा, ध्वनिमुद्रक अल्लाउद्दीन,एम. आर.आचरेकर, विश्व मेहरा, निर्मिती व्यवस्थापक मोहन बाली ,हरीश बिब्रा आदींचीही मोठी साथ मिळाली.

१९६१ सालचा 'जिस देश मे गंगा बहती है ' हा त्यांचा अखेरचा कृष्णधवल चित्रपट होता. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा सुरू झाला तो 'संगम ' या टेक्निकलर चित्रपटाने. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट आजही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या चित्रपटापासून भारतात सफाईदार रंगीत चित्रपटांचे युग सुरू झालं. ( अर्थात भारतीय रंगीत चित्रपट इतिहासामध्ये मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेला ' आन ' (१९५२)हा पहिला चित्रपट आहे. ) मात्र संगम मधील सफाईदार रंगीत छायाचित्र ण, स्विझर्लंड पॅरिस चर्चा ठिकाणी चित्रीकरण, सादरीकरणातील नावीन्य आणि उच्च निर्मिती मूल्य, दोन मध्यंतर असलेला २३८ मिनिटांचा चित्रपट, उत्तम गाणी व संगीत, आधुनिक श्रीमंत जीवनशैली आणि अर्थातच राज कपूर, वैजयंतीमाला ,राजेंद्र कुमार यांचा अभिनय यामुळे हा चित्रपट भारतात आणि परदेशातही लोकप्रिय ठरला.


संगम नंतर मेरा नाम जोकर, बॉबी ( १९७३)सत्यम शिवम सुंदरम (१९७८) ,राम तेरी गंगा मैली , प्रेमरोगी असे अनेक नामवंत चित्रपट राज कपूर यांनी निर्माण केले आणि रसिकांना ते भावले. चित्रपट सृष्टीतील आपल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत राज कपूर यांनी आर.के. बॅनरच्या तेरा चित्रपटांसह अमर प्रेम, गोपीनाथ ,अंदाज, चोरी चोरी ,शारदा, परवरिश, फिर सुबह होगी,नजराना ,सपनो का सौदागर, अशिक अशा एकूण चौऱ्याहत्तर चित्रपटात अभिनय केला. गीतकार शैलेंद्र निर्मित व बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ' तिसरी कसम' ,ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शीत 'अनाडी 'मेहबूबचा 'अंदाज 'अशा त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. तिसरी कसम हा चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवरील काव्यात्म चित्रपट होता. फणीश्वरनाथ रेणू यांच्या 'मारे गये गुल्फाम ' या कादंबरीवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटात राज कपूर यांनी बैलगाडीवाल्याची आणि वहिदा रहमान यांनी तमाशातील नृत्यांगनेची भूमिका केली होती. मानवी मूल्यांबद्दल सर्व सामान्य माणसांची असलेली निष्ठा या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवली गेली. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई ,सजन रे झुठ मत बोलो, करमवा बैरी हो गये, पान खाये सैया ही गाणी प्रचंड गाजली.या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज कपूर म्हटले की ये रात भीगी भीगी, ओ मेहबूबा, डम डम डिगा डिगा, प्यार हुआ इकरार हुआ, दोस्त दोस्त ना रहा, जिना यहा मरना यहा,सजन रे झूठ मत बोलो , आ अब लौट चले, सबकुछ सिखा हमने, प्यार हुआ इकरार हुआ ,जाने ना नजर अशी त्यांच्यावर चित्रित झालेली असंख्य गाणी आठवतात. तसेच त्यांच्या चित्रपटातील नाही का व इतर कलाकारांवरची चूक झालेलीही असंख्य गाणी आठवतात. चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. २ मे १९८८  रोजी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला तेव्हा राज कपूर यांची प्रकृती अतिशय खालावलेली होती. राष्ट्रपती व्यंकट रमण मंचावरून खाली सभागृहात आले. आणि त्यांनी कसेबसे उभे राहू पाहणाऱ्या राजकपूर यांना पुरस्कार दिला. राज कपूर यांना श्वास घेणे ही कठीण होऊ लागले. ते खुर्चीत कोसळले. त्यांना घाईघाईने राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेतील रुग्णवाहिकेतून ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये नेण्यात आले. लढवय्ये राजकपूर अस्थम्याच्या तीव्र धक्यातून त्वरित उपचार मिळाल्याने वाचले.


 १९७१ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवले देश-विदेशातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तर त्यांना अकरा फिल्म अवॉर्ड मिळालेली होती. त्यांच्याच काळात दिलीप कुमार आणि देवानंद सारखे नामवंत नायक कार्यरत होते. प्रत्येकाची शैली वेगळी होती. ' दिलिप देव राज  त्रिकूटाने तो कालखंड गाजवला होता. अभिनय, दिग्दर्शन, निर्मितीमूल्य ,तंत्रज्ञान ,कला जाणीव, या सर्व क्षेत्रात राज कपूर यांचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते. क्रिकेट या खेळाची त्यांना प्रचंड आवड होती.ते देश-विदेशात क्रिकेटचे सामने पाहायलाही जात असत.येणाऱ्या अनेक शतकांसाठी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले नाव करून ठेवून ' तुम्हाला रुबाबात जाता येत नसेल तर न जाणेच बरे 'असे म्हणणारा हा महान शो-मॅन वयाच्या ६४  व्या वर्षी २ जून १९८८ रोजी नवी दिल्ली येथे कालवश झाला. राज कपूर यांना आपल्या वाढत्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे १९८७ च्या प्रारंभ पासूनच मृत्यूची चाहूल लागली होती. ते आपल्या पत्नीला म्हणाले ही होते, 'मला वाटतं मी या जगातून निघून जायची वेळ आली आहे. आणि याची जाणीव थोडीफार भवतालाही झालेली आहे .नाहीतर माझ्यावर पुस्तकं लिहिली जात आहेत, लघुपट बनवले जात आहेत. हे एकाएकी का होत आहे ? याची संगती कशी लावता येईल ?.'त्यांच्या निधनानंतर जगभरच्या माध्यमातून त्यांची दखल घेतली. भारतभरातून आणि जगभरातून हजारो शोकसंदेश आले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शोक संदेशात म्हटले की ,'या देशाच्या या अद्वितीय सुपुत्राला श्रद्धांजली वाहताना आणि त्याच्या शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करताना साऱ्या देशातील जनता माझ्याबरोबर आहे.केवळ चित्रपट व्यवसायावर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे असे नाही, तर कर्मणुकीच्या या माध्यमाची सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील सामाजिक, आर्थिक समस्यांची योग्य सांगड घालण्याची सूचकता व सामर्थ्य असल्यामुळे सर्व देशाच्या जीवनावरच  त्यांची छाया पडली आहे. त्यांच्यामधील मानवता, माणसांवर प्रेम करण्याची क्षमता आणि दीनदुबळ्यांबद्दल त्यांना असलेल्या कळवळा यामुळे राज कपूर यांना लोक कधीच विसरू शकणार नाहीत '.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post