प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.३० केंब्रिज आणि ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठात सतत अव्वल क्रमांकाने यशस्वी होत मिळवलेल्या अर्थशास्त्रातील पदव्या,अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक,भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर ,भारताचे अर्थमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून सलग दहा वर्षे कार्यरत राहिलेले डॉ.मनमोहन सिंग हे जागतिक पातळीवरचे थोर अर्थतज्ञ होते. त्यांच्या उत्तुंग व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वांमध्ये कमालीचा साधेपणाही अंगभूत होता. त्यांनी कोणताही फारसा गाजावाजा न करता भारतीय अर्थव्यवस्थेचे वास्तव लक्षात घेऊन कणखरपणे भारतीय अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आर्थिक धोरणांना वैचारिक पातळीवर विरोधही झाला.मात्र धाडसी सुधारणा करत त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची संरचना मोठ्या प्रमाणात बदलली. डॉ . मनमोहन सिंग निधनानंतर जगभरातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत ते पाहिल्यानंतर भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त आर्थिक विकास हा मनमोहन सिंग यांच्या काळात झाला हे सर्वमान्य झाले आहे. तसेच त्यांच्या विद्वत्तेबाबत जागतिक पाठीवर फार मोठा आदर होता हेही दिसून आले. देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर अविवेकी घोषणा करून उपयोग नसतो तर शास्त्रीय पद्धतीची धोरणे आखावी लागतात व ती अंमलबजावणी चा आणावी लागतात हा संदेश त्यांनी दिला.इतिहास आपले मूल्यमापन दयाळूपणे करेल असे त्यांनी म्हटले होते. त्यातील अर्थ आणि अन्वयार्थ जाणून घेऊन देशाची आर्थिक रचना खऱ्या अर्थाने सुदृढ करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. 'डॉ. मनमोहन सिंग यांचा अर्थविचार ' हा चर्चासत्राचा विषय होता.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, दयानंद लिपारे, अशोक केसरकर ,देवदत्त कुंभार ,सचिन पाटोळे, पांडुरंग पिसे ,रामचंद्र ठिकणे, शकील मुल्ला, शहाजी धस्ते , मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला. प्रारंभी डॉ. मनमोहन सिंग, श्याम बेनेगल आणि शाहीर विजय जगताप यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडून अनेक प्रश्नांविषयी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असे. 'जेव्हा सिंग बोलतात तेव्हा सार जग ऐकतं. ते आर्थिक संकटावर उपाय सांगणारे डॉक्टर आहेत 'असं बराक ओबामा त्यांच्याबद्दल म्हणाले होते. जागतिक स्तरावर अर्थक्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वमान्य होतं. राजकारणामध्ये एका विशिष्ट परिस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्या परिस्थितीवर त्यांनी जी मोहर उमटवली त्यामुळे आधुनिक भारताचा विचार मांडत असताना डॉ.मनमोहन सिंग यांचा अग्रक्रमाने विचार करावा लागतो. भारतीय अर्थकारण मनमोहन पूर्व मनमोहनोत्तर अशा कालखंडात विभागले गेले आहे. त्यांच्या अतिशय शांत, मृदू ,संयत व्यक्तिमत्त्वातील कणखरपणाही प्रसंगी पाहायला मिळाला. या चर्चासत्रात डॉ.मनमोहन सिंग यांच्या अर्थ विचाराची ,त्याच्या स्वीकाराची आणि त्याच्यावर झालेल्या टीकेचीही सविस्तर चर्चा करण्यात आली.