प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील सोफा फॅक्टरीला भीषण आग लागून एक कामगार होरपळल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. पुण्याच्या येवलेवाडी परिसरात दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हरून अहमद खान असे मयत कामगाराचे नाव आहे.आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून आग नेमकी कशी लागली याबाबत तपास सुरू आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचे काम सुरू असताना छोट्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. आगीत फॅक्टरीचेही मोठे नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझली. आगीत गंभीर भाजलेल्या कामगाराला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेबद्दल लोक काय म्हणाले?
या घटनेबाबत स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शी सांगतात की, या युनिटमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अशा घटना टाळता याव्यात यासाठी औद्योगिक घटकांनी सतर्क राहून सुरक्षा निकषांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.