प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : लहान मुलांमध्ये असंरचित मुक्त खेळाच्या महत्त्वावर भर देत पुणे महापालिकेचे आदरणीय अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांच्या शुभहस्ते सारसबागेत अर्बन 95 पुणे किड्स फेस्टिव्हलचे उद्घाटन दि.१९/१२/२०२४ रोजी करण्यात येणार आहे.. लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आकर्षक उपक्रमांनी भरलेला हा उत्सव वानलीयर फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि डब्ल्यूआरआय इंडियाच्या तांत्रिक सहाय्याने आयोजित करण्यात आला आहे.
किड्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या आवृत्तीत सारसबागेतील नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेल्या मॉडेल खेळाच्या जागेतून निसर्गाधारित आणि संवेदनाक्षम खेळाच्या विविध कृतींचा समावेश आहे. आजकाल मुलांचे खेळाचे साधन म्हणून केवळ खेळणी आणि डिजिटल माध्यमांचा वापर होतो. ही दोन्ही माध्यमे प्रौढांनी ठरवलेली असल्यामुळे ती मुलांसाठी संरचित स्वरूपाची असतात. अशा परिस्थितीत, निसर्गात मुक्त खेळाचा वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळते. पुणे किड्स फेस्टिव्हल लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सार्वजनिक जागांमध्ये ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे.