प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दारुच्या नशेत असलेल्या रिक्षा चालकाने राँग साईडने रिक्षा चालवून कॅबला धडक दिल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना नगर -पुणे रोडवर आगाखान पॅलेस समोर रविवारी २९ डिसेंबर रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
धरमवीर राधेशाम सिंग (वय-३८, रा. श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यु झालेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी कॅबचालक पराग सुनिल शर्मा (वय- २८, रा. हॅप्पी इस्टेट, चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जॉन राजू स्वामी (वय-३१, रा. मुळीक कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन स्वामी हा दारु पिऊन रिक्षा चालवत होता. तो दारूच्या नशेत प्रवाशांना घेऊन वडगाव शेरीहून आला होता. त्यावेळी त्याने रॉंग साईडने भरधाव वेगाने रिक्षा चालवली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कॅबच्या डाव्या बाजूस त्याने जोरदार धडक दिली.
दरम्यान, त्यानंतर त्याची रिक्षा कॅबच्या मागे जाऊन पलटी झाली. त्यामुळे फिर्यादी यांच्या गाडीचे समोरील डाव्या बाजूचे बंप्पर, हेडलाईट चेंबून तुटून मोठे नुकसान झाले. मात्र, रिक्षा पलटी झाल्याने रिक्ष्यातील प्रवासी धरमवीर राधेशाम सिंग यांचा मृत्यु झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लमखेडे करीत आहेत.