प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी, पुणे : केंद्र सरकारच्या वतीने चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या एसआयएच २०२४ सॉफ्टवेअर स्पर्धेत रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरग अँड रिसर्चच्या टीम डिजिटल डॉकेट्सने सॉफ्टवेअर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.
देशातील अग्रमानांकित इंजिनिअरिंग कॉलेजपैकी एक असणाऱ्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे (पीसीसीओईआर) मधील टीम डिजिटल डॉकेट्सने महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या जात आणि इतर प्रमाणपत्रे ऑनलाइन जारी करण्यासाठी तात्काळ पडताळणी (रिअल-टाइम मॉनिटरिंग) करावी लागते. त्यासाठी टीम डिजिटल डॉकेट्सने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे सादरीकरण केले. राज्यात दरवर्षी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक विद्यार्थ्यांना महसूल विभागाकडून जात आणि इतर प्रमाणपत्रे दिली जातात. त्यात होणाऱ्या दिरंगाई व गैरसोयी मुळे अनेक विद्यार्थी व पालकांना त्रास होतो. प्रवेश प्रक्रिया काळात महसूल विभागात प्रमाणपत्र मागणीचे प्रमाण जास्त असते. शासकीय यंत्रणेवर ताण येतो त्यासाठी या सॉफ्टवेअर द्वारे प्रमाणपत्रांच्या तपशीलवार मूल्यमापनासह जिल्हा आणि केंद्रीय स्तरावरील प्रभावी निरीक्षण करून प्रमाणपत्रांचे वाटप अधिक सक्षमपणे करता येईल.
टीम डिजिटल डॉकेट्स मध्ये आदि भुजबळ (टीम लीडर), तेजस भंगाळे, काव्या पाटील, नुपूर पटवर्धन, प्रेम कुलकर्णी, आलोक चतुर्वेदी यांचा समावेश होता. त्यांना डॉ.महेंद्र साळुंके, डॉ.शिवगंगा गव्हाणे, विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे , अजिंक्य काळभोर ,कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.
--------------------------------------------