प्रेस मीडिया लाईव्ह :
केस कापणे आणि दाढी करणे आता 20 टक्क्यांनी महागणार असून येत्या 1 जानेवारीपासून ही नवी दरवाढ लागू करण्याचा निर्णय सलून आणि ब्यूटी पार्लरच्या व्यावसायिकांनी घेतला आहे.महाराष्ट्रात सध्या दीड लाखाच्या आसपास सलून आणि ब्यूटी पार्लर असून त्यावर सुमारे 13 लाख कारागीरांचा उदरनिर्वाह चालतो. सर्वच क्षेत्रांतील वाढत्या महागाईची झळ सलून आणि ब्यूटी पार्लर व्यावसायिकांना देखील बसलीय. त्यामुळे 20 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय नाभिक संघटनांनी घेतला आहे. सलून आणि ब्यूटी पार्लर व्यावसायिक सध्या आकारात असलेल्या दरानुसार ही नवी दरवाढ करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत साध्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी 100 रुपये, तर दाढी करण्यासाठी 50 रुपये आकारले जातात. एसी सलूनमध्ये हेच दर अनुक्रमे 200 आणि 100 रुपये असे आहेत. हायफाय सलूनमध्ये केस कापण्यासाठी 500 रुपये, तर दाढी करण्यासाठी 200 रुपये आकारले जातात.
ब्लेड, कात्रीपासून ते सौंदर्य प्रसाधनांच्या दरात दीड ते दोन पटींनी वाढ झालीय. शंभर रुपयांना मिळणारी कात्री आता 300 रुपयांना तर 300 रुपयांना मिळणारी कलरची टय़ूब आता 450 रुपयांना मिळतेय. याशिवाय दुकानांचे भाडे, कारागीरांची मजुरी, पालिकेची वाढलेली लायसन्स फी, जीएसटी, प्रोफेशनल टॅक्स या सर्व गोष्टींमुळे सलून व्यावसायिक आर्थिक विवंचनेत अडकलाय. त्यामुळे नवी दरवाढ लागू करण्याशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय नाही. – सयाजी झुंजार, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ