तीन दिवसांची पोलीस कोठडी . तर अन्य संशयीतांचा शोध चालू.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या टोळीस जुना राजवाडा पोलीसांनी अटक केली असून या गुन्हयात गर्भपाताची औषधे पुरवणारा एमआर. (मेडीकल रिप्रेझेंटीव्ह) विजय सुनील पाटील (वय २५ रा. वरणगे पाडळी, ता.करवीर) याला रविवारी जुना राजवाडा पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपण गोळ्या पुरवल्याची कबुली दिली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर शहातील फुलेवाडी व जुना बुधवार पेठे येथे बेकायदेशिर गर्भलिंग तपासणी व गर्भपात केला जात असल्याची माहिती मिळाल्यनांतर जुना राजवाडा पोलीसांनी २० डिसेंबर रोजी छापा टाकून बोगस डॉक्टर दगडू बाबुराव पाटील (वय ४५ रा.देवकर पाणंद),सोनोग्राफी करणारा बोगस डॉ. गजेंद्र बापूसो कुसाळे (वय ३७ रा. सिरसे,ता.राधानगरी),मदतनीस बजरंग श्रीपती जांभीलकर (वय 31 रा. कसबा ठाणे,ता.पन्हाळा) या तिघांना अटक केली.
सध्या हे तिघेजण पोलीस कोठडीत आहेत. पोलीसांनी कसून चौकशी केल्यानंतर आपणास गर्भपाताच्या गोळ्या पुरवठा करणारा एमआर. विजय सुनील पाटील हा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी पाटील यास अटक केली. या टोळीतील अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे हे पुढ़ील तपास करीत आहेत.
-------------
इंस्टाग्रामवर मेसेज करून पंचगंगेत उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.
शोध पथकाला यश. नातेवाईकांनी फोडला टाहो.
कोल्हापुर - मित्रांना इन्स्टाग्रामवर ऑनलाईन घेऊन शनिवारी दुपारी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेणारा हर्षवर्धन विजय सुतार (वय २१ रा. राज्योपाध्यनगर,कोल्हापूर) याचा मृतदेह शोधण्यात रविवारी करवीर पोलीस व अग्नीशमन दलास यश आले. यांत्रिक बोटीच्या सहायाने पाण्यात गळ टाकून सकाळी १०.४५ वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यावेळी नातेवाईक व मित्रांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
हर्षवर्धन सुतार हा शहरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.हर्षवर्धन मुळचा वरणगे पाडळी (ता.करवीर) गावचा असून तो लहानपणापासून मामाच्या घरी राजोपाध्यनगरात रहात होता. त्याच्या आईचे निधन झाले असून वडील सुतारकाम करतात. आजी व मामा यांनी त्याच्या भविष्याबद्दल बोलल्याने हर्षवर्धनला राग आल्याचे समजते.या कारणातुन त्याने हा प्रकार केल्याची चर्चा होती. दुपारी दीड वाजता तो आपली मोटारसायकल घेऊन पंचगंगा नदीवर आला. शिवाजी पुलावर गेल्यानंतर त्याने सर्व मित्र व चुलत भावाला इन्स्ट्राग्रामवर येण्याचा मेसेज टाकला.
सर्वजण ऑनलाईन आल्यानंतर 'माझ्या वैयक्तीक अडचणीमुळे मी आत्महत्या करीत आहे. मात्र तुम्ही सर्वजण आनंदाने रहा' असे म्हणत त्याने शिवाजी पुलावरून नदीपात्रात उडी मारली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यत पोलीस व अग्नीशमन दलाने शोध मोहिम राबविण्यात आली होती.मात्र रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. करवीर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवला तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी त्याचे मित्र व नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेने आजी आणि मामाला मोठा धक्का बसला आहे.