जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणार - मंत्री हसन मुश्रीफ.
नियोजनबद्ध पद्धतीने कोल्हापूरचा विकास गतीने करणार - मंत्री प्रकाश आबिटकर.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्री हसन मुश्रीफसो आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रथमच कोल्हापुरात आगमन झाल्यावर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रथम करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मंदिरात देवस्थान समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व देवीची साडी देऊन श्री. मुश्रीफ व श्री. आबिटकर यांचे स्वागत केले. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी खासदार संजय मंडलिक, उसेद मुश्रीफ व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यातील अपूर्ण सर्व प्रकल्प मार्गी लावले जातील, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त करुन हाती घेतलेले प्रत्येक कार्य प्रामाणिकपणे पार पाडणार असून त्यात यश मिळो, असे साकडे त्यांनी श्री अंबाबाई चरणी घातले.
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कोल्हापूरचा विकास गतीने साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच "कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जबाबदारीने योगदान देऊन मिळालेल्या संधीचं सोनं करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागासह जिल्ह्याचे सर्व प्रश्न गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिली.