यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही, ध्येय गाठण्यासाठी सातत्य आणि मेहनतीला पर्याय नाही, खासदार धनंजय महाडिक यांचा विद्यार्थ्यांना सल्ला.




प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर  - शालेय जीवनात यश मिळवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही. खरंतर ध्येय निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी ठेवावी लागते. तरच यशाचं शिखर गाठता येईल, असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. सौ. अरूंधती महाडिक यांनी विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याचं  खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि इन्स्पायर ऍकॅडमीच्यावतीनं, घेण्यात आलेल्या कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेत, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते.

भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि इन्स्पायर ऍकॅडमी यांच्यावतीनं, कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत यशस्वी झालेल्या २०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षिस वितरण समारंभ आज पार पडला. टाकाळा इथल्या व्हि.टी.पाटील सांस्कृतिक भवन मध्ये हा कार्यक्रम झाला.  खासदार धनंजय महाडिक, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, उद्योजक सचिन मेनन, बी.एम.हिर्डेकर, वैशाली भोसले, हर्ष अग्रवाल, बी.एस. शिंपुकडे, रमेश खटावकर, प्रशंात शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे रमेश खटावकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. देशाच्या प्रगतीसाठी तरूणांनी दर्जेदार शिक्षण घेणं गरजेचं आहे. आपल्याकडं असलेलं ज्ञान जगाच्या ज्ञानासोबत जोडलं गेलं पाहीजे, असा सल्ला एनएसईचे मार्गदर्शक हर्ष अग्रवाल यांनी दिला. 

गुणांच्या मागं धावण्यापेक्षा, सुनियोजित पध्दतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांमधील बौध्दीक क्षमता विकसित होण्यासाठी अशा परीक्षा महत्वपूर्ण ठरतील, असं वर्षा संकपाळ यांनी नमुद केलं. विद्यार्थ्यांनी आयआयटी, नीट यासारख्या परीक्षांमध्ये उच्च गुणवत्ता सिध्द करण्याचं टार्गेट निश्‍चित केलं पाहीजे. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी सुध्दा मिळवता येईल. पण त्यासाठी चांगल्या ऍकॅडमींचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, असं युनिक ऍकॅडमीचे संचालक शशिकांत बोराटकर यांनी सांगितलं. ग्रामीण भागात खुप टॅलेंट आहे, पण त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ  मिळत नाही. रोटरी आणि इन्स्पायर ऍकॅडमीच्यावतीनं, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. अशा उपक्रमामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील, असं मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी नमुद केलं. महिला सक्षमीकरणासोबतच समाजातील हिरे शोधण्याचं गौरवास्पद काम सौ. अरूंधती महाडिक करतायत. विद्यार्थ्यांनी मेंदुला ताण द्यावा, सातत्यानं कामात व्यस्त रहावं, अभ्यास, वाचन, लेखन, निरीक्षण या पध्दतीचा अवलंब केल्यास निश्‍चित यशस्वी होता येईल, असा विश्‍वास शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक बी.एम.हिर्डेकर यांनी व्यक्त केला. महाडिक कुटुंब समाजसेवेसह सर्वच क्षेत्रात जनतेच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतं. प्रचंड मेहनत आणि तयारी केल्यामुळंच जागतिक स्तरावर फॉर्म्युला थ्री रेस स्पर्धेत देशाचं आणि कोल्हापूरचं नाव उज्वल करता आलं. मुलांनी अभ्यासासोबतच एखाद्या खेळाची आवड जोपासावी. त्यामुळं मन आणि शरीर सक्षम होतं आणि कोणत्याही कठीण परीक्षेला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, चांगले संस्कार, आहार, व्यायाम यामुळं मन आणि शरीर मजबुत बनतं, असं युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नमुद केलं. रोटरी आणि इन्स्पायर ऍकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव व्यासपीठ उपलब्ध झालंय. विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल असायला हवेत. रामायण, महाभारत वाचल्यास जगण्याचा उद्देश कळतो. वीज आणि पाणी बचतीबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला महत्व देणं गरजेचं आहे. त्यातून देश आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत अंगी बाणली जाईल. परिश्रमामध्ये सातत्य ठेवल्यास यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रधान शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. 

कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेत प्रथम आलेल्या अथर्व जोशी, वैष्णवी भुईंबर, आदित्य घेवारी, अभिनव पोवार, कल्याणी पाटील या विद्यार्थ्यांना टॅब, प्रशस्ती पत्र, नोटस् देवून गौरवण्यात आलं. तसंच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६० विद्यार्थ्यांना टॅब आणि प्रशस्ती पत्र देण्यात आलं. इतर १४० विद्यार्थ्यांचादेखील सौ. अरूंधती महाडिक, वर्षा संकपाळ, बी.एस.शिंपुकडे, भारती नायक, करूणाकर नायक यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post