प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - हात उसने पैसे घेऊन मुदतीत परत देतो म्हणून नोटरी करायची, आणि संबंधितांना चेकही द्यायचा.आणि त्यानंतर टाळाटाळ करत कायदेशीर कारवाईची भीती घालून पैसे बुडवण्याचा प्रयत्न करायचा. अशाप्रकारे एका युवकाला ४ लाख ६९ हजारांना गंडा घालणाऱ्या वकिलास शाहूपुरी पोलिसांनी पुण्यातून अटक केली. त्याने कोल्हापूरसह इतर जिल्ह्यात त्याच्यावर ११ गुन्हे दाखल असून, एका गुन्ह्यात त्याने तीन वर्षांची शिक्षाही भोगली आहे. अमोल आनंदराव पाटील (वय ५०, रा. नेजदार पार्क, कसबा बावडा) असे या वकिलाचे नाव आहे.
यातील फिर्यादी उदय मानसिंगराव पोवार (वय ४२, रा. रमणमळा, कोल्हापूर) यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे उदय पोवार यांच्याशी ॲड. पाटील याची ओळख झाली होती. याच ओळखीतून पाटील याने ऑगस्ट २०१६ मध्ये पोवार यांच्याकडे जमीन खरेदीसाठी हातउसने १० लाख रुपये मागितले. सुरुवातीला पोवार यांनी पैसे देण्यास नकार दिला. मात्र, फारच गळ घातल्याने आणि नोटरी करून सहा महिन्यांत सर्व पैसे परत करण्याचा शब्द दिल्याने पोवार यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये त्याला पाच लाख रुपये दिले.
ॲड. पाटील याने पैसे घेऊन सहा महिने उलटल्यानंतर पोवार यांनी त्याच्याकडे वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने पोवार यांनी पाटील याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर टप्प्याटप्याने पैसे देतो, असे पाटील याने सांगितले. त्याने केवळ ३१ हजार रुपये पोवार यांना परत केले. उर्वरित पैसे मिळत नसल्याने ॲड. पाटील हा आपले पैसे बुडवणार आहे, अशी खात्री झाल्यानंतर पोवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर ॲड. पाटील हा पळून गेला होता. त्याचे लोकेशन सापडत नव्हते. पोलिसांनी शोध घेतला; मात्र तो मिळाला नाही. दरम्यान, ॲड. पाटील याला दुसऱ्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून कारागृहातून सुटल्यानंतर पसार झालेला पाटील हा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची दि. १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.
-----