प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - कोल्हापुर शहरात आणि उपनगरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग तपासणी पथकावर पोलीसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात तपासणी करण्याचा कोणताही परवाना नसतानाही डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्या दोघांना पोलीसांनी जेरबंद केले. यातील गजेंद्र कुसाळे (वय ३७ रा. सिरसे ता.राधानगरी) याने बेळगाव येथून तीन लाख रुपयास आणलेल्या सोनोग्राफी मशिनमधून बेकायदा गर्भलिंग तपासणी करीत होता. यासाठी तो एका रुग्णाकडून पाच हजार रुपये घेत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
कुसाळे याच्याकडे सापडलेली पदवी ही बोगस असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले असून त्याने ही डिग्री कोणाकडून घेतली याची माहिती पोलीस घेत आहेत. कुसाळे याच्यावर अशाच प्रकारचे अन्य दोन गुन्हे राधानगरी व कोडोली येथे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली. कोडोली पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर कुसाळे पुण्याला पळून गेला होता.
कुसाळे याने २०२० साली बेळगाव येथून सोनोग्राफीची दोन मशिन प्रत्येकी तीन लाख रुपये याप्रमाणे सहा लाख रुपयांना विकत आणली होती. यातील एक मशिन पूर्वीच्या गुन्हयात पोलीसांनी जप्त केले होते. दुसरे मशिन त्याने आपल्या घरात लपवून ठेवले होेते. पोलीसांनी विचारपूस केल्यानंतर एकच मशिन असल्याचे त्यावेळी त्याने सांगितले होते. अशी माहिती तपास पुढे आली आहे. एका पेशंटला तपासण्यासाठी कुसाळे हा ५ हजार रुपये घेत होता.तर उर्वरित रक्कम त्याचे एजंट मिळवत होते.
सध्या जुना राजवाडा पोलीसांनी बोगस डॉक्टर दगडू पाटील (रा.४५ रा. देवकर पाणंद), गजेंद्र कुसाळे, व मदतनीस बजरंग श्रीपती जांभीलकर (वय 31 रा. कसबा ठाणे,ता.पन्हाळा) अशा तिघांना अटक केली आहे. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
--------------
फरार झालेल्या कैद्याच्या शोधासाठी दोन पथके.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडुन समांतर तपास.
कोल्हापुर - कळंबा जेल मध्ये खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी वजीर नानसिंग बारोला (वय ४१, रा. पाळनेर, जि. धुळे) याने पलायन केले. शेती कामासाठी खुल्या कारागृहात नेल्यानंतर तो सुरक्षारक्षकांची नजर चुकवून पळून गेला. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, राजावाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून या कैद्याचा शोध सुरू आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांत कळंबा कारागृहातून कैदी पळून जाण्याची ही तिसरी घटना आहे; मात्र पळून गेलेले कैदी पोलिसांनी पुन्हा पकडून कारागृहाच्या ताब्यात दिले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कैद्यांना शेती विभागात नेले होते. त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेतली जात होती. जे कैदी पळून जाणार नाहीत, चांगल्या वर्तणुकीमुळे खुल्या कारागृहात ठेवले जाते, त्यांनाच बाहेर काढले जाते. वजीर बारोला हा पाच महिन्यांपासून कळंबा कारागृहात आला आहे. त्याचे वर्तन चांगले होते. या पाच महिन्यांत त्याला एकही नातेवाईक भेटण्यास आला नव्हता अथवा फोनही कोणी केला नव्हता. शुक्रवारी सकाळी वजीरला शेती कामासाठी बाहेर नेल्यानंतर इतर कैदी व सुरक्षारक्षकांची नजर चुकवून तो पळून गेला. जुना राजवाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण अशी दोन पथके पलायन केलेल्या कैद्याचा शोध घेत आहेत.