प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- प्लास्टिक व्यापाऱ्याचे दुकान बंद पाडण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असणारा तोतया पत्रकार अजय प्रकाश सोनुले (वय 43.रा.गडमुडशिंगी ,ता.करवीर ) हा आज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाल्याने त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.
७ ऑक्टोंबर, २०२४ रोजी लक्ष्मीपुरी येथील प्लॉस्टिक व्यापारी सनी दर्डा यांच्या दुकानात तोतया पत्रकार अन्सार रफीक मुल्ला, शशिकांत कुंभार, जावेद देवडी, रहिम पिंजारी, दिलीप थोरात, मोहसिन मुल्ला, अजय सोनुले आदी आठ ते दहा जणांनी दुकानाचे कॅमेऱ्यावर शुटींग केले. तुमच्या दुकानात बेकायदेशिरपणे प्लॉस्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लासची विक्री केली जाते. आम्ही बातमी छापली तर दुकान बंद होईल. अशी भिती दाखवून पाच लाखांची खंडणी मागितली. दर्डा यांनी घाबरून ३ लाख रुपये अन्सार मुल्ला याच्याकडे दिले.
त्यानंतर दुसऱ्या ८ ऑक्टोंबर रोजी तथाकथीत सामाजिक कार्यकर्ता अजित पवार, एका वृत्तवाहिणीचा कॅमेरामन सागर चौगले, मयूर कांदेकर, सुशांत बोरगे, सुभाष कांबळे आदी आठ जणांनी सनी दर्डा यांच्या दुकानात जाऊन कारवाईची भिती दाखवून पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. दर्डा यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . या दोन्ही टोळ्यांवर खंडणींचा गुन्हा दाखल असून दोन्ही गुन्हयातील सहा जणांना अटक झाली आहे.
अन्सार मुल्ला, शशिकांत कुंभार, सागर चौगले, अजय सोनुर्ले या चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्यासमोर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामकाज चालले. यावेळी सरकारी वकील मयूर सोनवणे, ॲड. ऋतुजा आंबेकर, ॲड. सागर आगरकर, ॲड. बलराज कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.
यावेळी संबंधीत आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज आपण फेटाळत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तात्काळ हजर राहून पोलीस तपासात मदत करावी असेही न्यायालयाने जामीन फेटाळताना सांगितले.या गुन्हयाचा तपास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देठे हे करीत आहेत.