'
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१५ ,हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक , दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, पद्मभूषण राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने " गोष्ट एका शो-मन ची" हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.ज्येष्ठ रंगकर्मी अरुण दळवी आणि रंगयात्रा नाट्यसंस्थेचे संस्थापक प्रा. मिलिंद दांडेकर यांनी अतिशय बहारदार पद्धतीने त्याचे सादरीकरण केले .प्रारंभी अन्वर पटेल यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून राजकपूर यांची जन्मशताब्दी साजरी करण्यामागील औचित्य आणि त्याचे महत्व स्पष्ट केले.
अरुण दळवी व प्रा.मिलिंद दांडेकर यांनी जो पर्यंत निसर्ग आहे तोपर्यंत राज कपूर अमर आहेत कारण त्यांची कला मनुष्य केंद्रित आहे हे स्पष्ट करत राजकपूर यांनी आपल्या चित्रपटांतून भांडवलशाही आणि सामान्य माणूस यांच्यातील भेदाचे निकोप दर्शन घडवून आणले. आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी वाढत राहिली तर अनर्थ होईल हा संदेश त्यांनी अनेक चित्रपटांमधून दिला.राज कपूर यांनी सर्वांना आपल्या कष्टातून सन्मानाच्या किमान अर्ध्या भाकरीची हमी देणारा नेहरूंना अभिप्रेत असलेला समाजवाद किती उपयुक्त आहे याची मांडणी केली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा अतिशय निरागस, भोळा भाबडा , निष्पाप,निष्कपट असलेला' राजू'हा नायक रसिकांना प्रचंड भावला. त्याने या देशातीलच नव्हे तर नव स्वतंत्र देशातील करोडो सर्वसामान्य तरुणवर्गाच्या भावविश्वात स्वतःची जागा निर्माण केली.चित्रपट या करमणुकीच्या माध्यमाची सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील सामाजिक, आर्थिक समस्यांशी योग्य सांगड घालण्याची सूचकता व सामर्थ्य राज कपूर यांच्याकडे होते. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या पहिल्या तीन-चार पिढ्यांच्या जीवनावर राजकपूर यांची अमीट छाया पडलेली आहे. त्यांच्यामधील मानवता, माणसांवर प्रेम करण्याची क्षमता आणि दीनदुबळ्यांबद्दल त्यांना असलेल्या कळवळा यामुळे राज कपूर यांना लोक कधीच विसरू शकणार नाहीत हा विचार रसिकांवर प्रभावीपणे रुजवला.
दळवी व दांडेकर या रंगकर्मींनी आपल्या ओघवत्या संवादी मांडणीतून अनेक बारकावे स्पष्ट केले. ते म्हणाले चित्रपट निर्मिती करतांना राज कपूर यांनी संकलनासह सर्वच तांत्रिक अंगानाही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एक वेगळी तांत्रिक समृद्धी त्यांनी हिंदी चित्रपटांना दिली. छायाचित्रकार राघू करमाकर, संगीतकार शंकर जयकिसन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, पटकथाकार के. ए . अब्बास, कथाकार वसंत साठे,आणि पार्श्वगायक मुकेश यांच्या साथीने त्यांनी चित्रपट माध्यमाच्या प्रत्येक घटकात समृद्धी साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला हे अधोरेखित केले. तसेच आपल्या संवादी मांडणीतून राज नर्गिस केमिस्ट्री, आर.के. स्टुडिओची निर्मिती व वाटचाल , मुकेशचा आवाज व राज कपूर यांचा नायक, सोव्हिएत रशियातील प्रचंड लोकप्रियता, सर्वसामान्यांचा चेहरा घेऊन येणारा नायक, त्याच्या चित्रपटातील नायिका, राज कपूर यांचे दिग्दर्शन कौशल्य व बारकावे,निर्मितीतील भव्यता , निरागसतेतून मोठा वैश्विक संदेश, कमालीचा भाबडेपणा, संगीतातील तयार कान, विविध चित्रपटाच्या शूटिंग किस्से, विविध चित्रपटातून दिलेला संदेश, कपूर फॅमिलीचे भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदान आदी अनेक मुद्द्यांच्या आधारे सूत्रबद्ध मांडणी केली
तसेच राज कपूर यांच्या विविध चित्रपटातील अनेक संवादांचे त्यामागील संदर्भासह सादरीकरण केले.जाने कहा गये वो दिन, आवारा हू, होटोंपे सच्याई रहती है, आ अब लौट चले, दोस्त दोस्त ना रहा, दिल जलता है तो जलने दे, ओहो रे ताल मिले, दुनिया बनानेवाले तुने काहे को दुनिया बनाई, जाने कहा गये वो दिन, ए भाय जरा देखके चलो, पान खाय सैय्या हमारा, हम तुम एक कमरे में बंद हो, मैं शायर तो नहीं, इक दिन बीत जायेगा , राम तेरी गंगा मैली हो गयी, चंचल शितल निर्मल कोमल , जिना यहाँ मरना यहाँ आदी गाण्यांचे त्यामागील अन्वयार्थ सांगत सअभिनय सादरीकरणही केले.समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रा.रमेश लवटे, अहमद मुजावर,राजन उरुणकर,संतोष अबाळे, व्ही.आर.कुलकर्णी , राजन मुठाणे , बाळासाहेब नरशेट्टी, अजित मिणेकर, रिटा रोड्रिक्स ,अनिल होगाडे ,दिलीप शिंगे, रामचंद्र ढेरे, शकील मुल्ला, शशिकांत तारळेकर, महेंद्र जाधव, किरण कटके, बाळासाहेब केटकाळे यांच्यासह इचलकरंजी व परिसरातील रसिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजरंग लोणारी यांनी आभार मानले.