वाचक सभासद होऊन ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा 'यशस्वी करा मनोहर कांबळे यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.३० वाचन ही कधीही क्षय पावणारी गोष्ट नसते. वाचन आपले व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करत असते.आपल्याला परिपूर्ण होण्यासाठी मदत करत असते. समाज जीवनात वावरत असताना वाचनातून निर्माण होणारी प्रगल्भता आपल्याला वेगळा सन्मान मिळवून देत असते. वाचन ,लेखन आणि श्रवण या तिन्ही कलानी मानवी जीवन व संस्कृती समृद्ध झालेली आहे.त्यामुळे प्रत्येकाने विद्यार्थी दशेतच ग्रंथवाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन ग्रंथालय सर्व प्रकारच्या हजारो पुस्तकांनी व अनेक नियतकालिकांनी समृद्ध आहे. त्याचा बाल, किशोर ,तरुण, वृद्ध अशा सर्व वयोगटातील वाचकांनी सभासदत्व घेऊन लाभ घ्यावा व वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान यशस्वी करावे ,असे मत प्रबोधन वाचनालयाचे सभासद  मनोहर कांबळे यांनी व्यक्त केले ते ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा 'या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची ग्रंथालयाला अभ्यास भेट या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रसाद कुलकर्णी,प्रा.रोहित शिंगे व प्रा.भारती कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नंदा हालभावी यांनी ग्रंथभेट देऊन स्वागत केले.तसेच सौदामिनी कुलकर्णी यांनी प्रबोधन वाचनालयाची विभागवार माहिती दिली. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्व विभागातील पुस्तके हाताळली चाळणी व वाचली. त्यामुळे या उपक्रमाला एक यशस्वीता लाभली. यावेळी प्रा रोहित शिंगे व प्रा.भारती कोळेकर यांनीही वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि तिचा विकास करण्याची गरज यावर मनोगत व्यक्त केली.प्रबोधन वाचनालयात दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजीमधील बी.ए .आणि एम.ए.मराठीचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभ्यास भेट दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर आणि मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यास भेट झाली. 


तरुणवर्ग वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याने त्याला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आणि पर्यायाने सार्वजनिक ग्रंथालयांकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांच्या माध्यमातून विद्यार्थी/विद्यार्थींनींची वाचन संस्कृती वाढविण्याकरिता दि.१ ते  १५ जानेवारी २०२५ या कालावधीत  “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.या काळात सार्वजनिक ग्रंथालयांतर्फे सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, सभासद नोंदणी करणे यासारखा उपक्रम तसेच या व्यतिरिक्त अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त वाचन संकल्पाला चालना देण्यासाठी १ व २ जानेवारी २०२५ रोजी विविध विषयांवरील वाचनीय व दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे,अशी माहिती प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.यावेळी सुवर्णा कोकणी, मैथिली मुदगल,अंजली गोंगडी, तेजस्विनी आवळे ,प्रियंका हिंगमिरे ,रुकसार शेख, गायत्री कानडे, सुप्रिया एकांडे, अंकिता माळी, संजीवनी कांबळे ,आरती कांबळे, सोनल शिरगावे, सानिका पवार, सानिका माने ,शिवानी पवार, अभिषेक गायकवाड ,श्रेयस माणगावे, सुदर्शन कांबळे ,तुषार कोंडेकर , सुरज सुतार ,विजयसिंह कदम , धम्मध्वज कांबळे, अंकिता घोडके, लक्ष्मी पाटील ,पूजा शेट्टी, अपूर्वा उंदुरे,पुनम परिवार, सानिया आदमाने, दीक्षा हणबर , करुणा यादव, स्वप्नाली कांबळे, प्रकाश डोंगरे,प्रीती भिसे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post