प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.६ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांची सत्याची मांडणी करणारी आणि सत्याचे शोधन करणारी विचारधारा अतिशय महत्त्वाची आहे.आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झालेला असताना आणि भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना या दोन्ही महामानवांचे विचार घेऊन वाटचाल करणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना बोलत होते. प्रारंभी प्रा.रमेश लवटे व अन्वर पटेल यांच्या हस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर प्रज्ञावंत, तत्वचिंतक , इतिहास तज्ञ,अर्थतज्ञ , जलतज्ञ,चिकित्सक अभ्यासू लेखक, ख्यातनाम संपादक, बुजुर्ग नेते अशा विविध पैलूंचा समुच्चय असलेलं थोर व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पुढील अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारी एक महत्त्वाची विचारधारा आहे .तसेच सत्यशोधक विचारधारा आणि महात्मा गांधी यांचा बालपणापासून प्रभाव असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी तलाठ्याची नोकरी सोडून भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग घेतला. सविनय कायदेभंगापासून छोडो भारत पर्यंत आणि प्रतिसरकार पासून भारतीय स्वातंत्र्य दिनापर्यंतच्या सर्व आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेत नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतरही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी राजकीय ,सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. यावेळी धोंडीराम शिंगारे, प्रकाश काणे ,बाळकृष्ण निमणकर, बशीर मुल्लाणी,अनिल धमणगे सौदामिनी कुलकर्णी ,नंदा हालभावी, पांडूरंग पिसे, रामदास कोळी, अजित मिणेकर आदी उपस्थित होते.