प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी. देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांच्या माध्यमातून विद्यार्थी/विद्यार्थींनींची वाचन संस्कृती वाढविण्याकरिता दि.१ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व जिल्ह्यातील ६३१ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतर्फे या कालावधीत सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन व सदर कालावधीत अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करणे यासारखा उपक्रम तसेच या व्यतिरिक्त अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी दिली. इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी स्मृतीजागर कार्यक्रमासाठी आल्या असताना त्यांनी ही माहिती दिली.
अपर्णा वाईकर म्हणाल्या,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, राजारामपूरी अकरावी गल्ली, कोल्हापूर येथे व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी विविध विषयांवरील वाचनीय व दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सदर ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी/विद्यार्थींनी व इतर नागरिकांनी घ्यावा. तसेच दि.१ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये महाविद्यालयांतील विद्यार्थी/विद्यार्थींनी व इतर सर्व नागरिकांसाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महाविद्यालयांमधील विद्यार्थी/विद्यार्थींनी व इतर सर्व नागरिकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे तसेच आपल्या भागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद व्हावे. “जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,२०७८,श्रीराम निवास, आकाशगंगा अपार्टमेंटसमोर, राजारामपूरी अकरावी गल्ली, कोल्हापूर” या कार्यालयास सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी १० ते सायं.६ या वेळेत संपर्क साधावा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात विविध विषयावरील दर्जेदार वाचनीय ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहेत. “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभिनव उपक्रमात सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी/विद्यार्थींनी व इतर सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी अपर्णा वाईकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कोल्हापूर यांनी केले.