माणूस केलंत तुम्ही मला ' म्हणणारे मंगेश पाडगावकर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

३० डिसेंबर हा पद्मभूषण ,महाराष्ट्र भूषण, कवी कुलभूषण मंगेश पाडगावकर यांचा स्मृतिदिन. मराठी रसिकांच्या अनेक पिढ्या प्रेमरसाच्या वर्षावात  चिंब करणारा थोरकवी अस्सल व अव्वल दर्जाचा प्रतिभावंत ही त्यांची ओळख होती. मंगेश पाडगावकरांची कविता कालातीत होती व आहे.' इतकं दिलंत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलत तुम्ही मला ' असा रसिकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करणाऱ्या पाडगावकरांनी आपल्या कवितेतून प्रेमाची माहिती गायली. म्हणून तर त्यांची कविता, गीते गेली सात दशके रसिक मनावर गारुड करून आहेत .मराठी भाषेचे भूषण असलेली त्यांची कविता पंचवीसहून अधिक भाषांत भाषांतरित झाली. तिला अखिल भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवरही सन्मान मिळाला. चाळीसावर कविता संग्रह आणि बायबलचे भाषांतर व मुक्तचिंतनातून आणि हजारो मैफलीतून आनंदयात्री पाडगावकरांनी जीवनाचे तत्वज्ञान फार सुरेख आणि सुबोधपणे मांडले. अबालवृद्धांना खिळवून ठेवणारी त्यांनी केलेली निर्मिती मराठी अक्षर साहित्याचे लेणे आहे. ' डोळ्यात जेव्हा आसवं असतात, तेव्हाच माणसं माणसं असतात 'अस  पाडगावकर म्हणतात.


सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?,असा बेभान हा वारा, अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी,जेव्हा तुझ्या बटाना उधळे मुजोर वारा ,सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणी म्हणत, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, जपून चाल पोरी जपून चाल,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, शुक्रतारा मंद वारा ,लाजून हासणे अन हासून ते पाहणे, श्रावणात घननिळा बरसला, सावर रे सावर रे उंच उंच झुला, चिऊताई चिऊताई दार उघड अशी शेकडो गाणी लिहिणारे मंगेश पाडगावकर १०  मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला येथे जन्मले.तेथे प्राथमिक शिक्षण घेऊन ते उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले आणि अखेरपर्यंत तिथेच राहिले.मराठी आणि संस्कृत विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए.केले होते त्यांना मानाचे तर्खडकर व केळकर सुवर्णपदकही मिळालेले होते.


मंगेश पाडगावकर १९५१  साली मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. १९५३ साली ते साधना साप्ताहिकात संपादक म्हणून काम करू लागले. १९५७ साली ते आकाशवाणीत नोकरीसाठी रुजू झाले.मध्यंतरी दोन वर्षे मुंबईच्या रूईया कॉलेजात प्राध्यापकाचे काम करून ते पुन्हा आकाशवाणी आले.१९७०  ते १९९० अशी वीस वर्षे त्यांनी युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्विसच्या मुंबई कार्यालयात मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले. वयाच्या बावीसव्या वर्षी त्यांनी यशोदा उजगरे यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. त्या रेव्हरंड भास्कर उजगरे यांच्या कन्या होत्या. यशोदाबाईंनी आपल्या ' कुणास्तव- कुणीतरी ' या आत्मचरित्रातून आपली सांसारिक कहाणी रेखाटलेली आहे.


वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच काव्य लेखन करणाऱ्या पाडगावकरांचा 'धारानृत्य 'हा पहिला कवितासंग्रह १९५० साली आला. त्यानंतर कमालीच्या सातत्याने त्यांचे संग्रह येत राहिले व गाजत राहिले. २०१३ साली त्यांचा ' अखेरची वही ' हा संग्रह आला .पाडगावकरांना हा आपल्या अखेरचा संग्रह आहे असे वाटत होते ते तसे म्हणत होते .पण त्यानंतरही कविता त्यांना स्फुरत गेल्या ,त्यातून काही काव्यलेखन झाले.पाडगावकरांचे सर्व संग्रह मराठीतील ख्यातनाम असलेल्या मौज प्रकाशनने काढलेले आहेत.


बा.सी.मर्ढेकरांनी मराठी नवकाव्याचा नवा जमाना सुरू केला. याच काळात पाडगावकर आपल्या कवितातून उत्कट प्रेमभावना, तरल निसर्ग जाणीव, हसरा खेळकर विनोद, प्रस्थापित व्यवस्थे विरुद्धचा उपवास ,वात्रटिका ,बोलगाणी आदी माध्यमातून प्रभावीपणे मांडणी करायला सुरुवात केली होती. ती रसिकमान्य होत गेली.त्यांचा' उदास बोध ' हा जगण्याचा अर्थ शोधू लागला.त्यांनी मीरा ,कबीर यांच्यासह अनेक इंग्रजी कवितांचे अनुवाद केले . छंदोबद्धता आणि मुक्तछंदही  तेवढ्याच ताकतीने त्यांनी हाताळला.पाडगावकरानी बोरकर आणि करंदीकर यांच्या कवितांचे संपादनही केले.'निंबोडीच्या झाडामागे' सारखे ललितबंध लिहिले. मराठी काव्यरचनेच्या क्षेत्रात पाडगावकर- करंदीकर -बापट या त्रयीने केलेले काम अजोड स्वरूपाचे आहे. पानोपानी असलेली ही कविता गावोगावी आणि मनोमनी पोहोचवण्यामुळे साहित्य, समाज आणि संस्कृती यांचे बंध घट्ट करण्यात यशस्वी झाली.


मिश्किलता हा त्यांचा स्वभावधर्म होता. तो अंगभूत असल्याने अखेरपर्यंत त्यांच्या समवेत होता.त्यांच्या वागण्या बोलण्यातून, कविता सादरीकरणातून तो प्रत्ययाला यायचा. कटुता,वैफल्य ,दुर्बोधता यांच्यापासून त्यांची कविता दूर राहिली, कारण जीवनाचा समरसून 

आस्वाद घेणारा आणि इतरांचेही जीवन आनंदयात्री बनविणारा हा कवी होता. ते म्हणाले होते "तुमचं दुःख खरं आहे कळतं मला ,शप्पथ सांगतो तुमच्या इतकच छळतं मला ,पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं ,आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं...". स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेतील एक अग्रगण्य कवी म्हणून त्यांची नोंद मराठी वाङ्मयाच्या आणि रसिक मनाच्या इतिहासात ,वर्तमानत झालेलीच आहे . भविष्यातही रसिकांना ही कविता आपली वाटणार आहे. कारण मानवी भावभावनांच्या शब्दकळेचा जिवंत झरा त्यांची कविता प्रसवत राहिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे 'विद्यापीठ गीत 'त्यांनी लिहिले होते.त्याच ताकदीने 'लिज्जत पापड 'ची जाहिरात गीतेही त्यांनी लिहिली.


प्रचंड लौकिक ,रसिक मान्यता मिळूनही पाडगावकर आपले पाय अखेरपर्यंत जमिनीवर ठेवू शकले.मातीच्या पायाचा हा कवी माणुसकीच्या मातीचा अखंड दरवळ दूरवर नेण्यातच धन्यता मानत राहिला. विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. साहित्य अकादमी ,महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण आदी अनेक पुरस्कारानी त्यांना गौरवले.अर्थात पाडगावकरातील प्रतिभावंताची आणि रसिकांनी त्यांच्यावर भरभरून केलेल्या प्रेमाची उंची नेहमीच सर्व पुरस्कारांहून महत्त्वाची होती. ३० डिसेंबर २०१५ या दिवशी पाडगावकर कालवश झाले. त्या दिवशी महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांचे निकाल लागलेले होते. विजयी उमेदवारांचे गुलाल उधळले जात होते, फटाके फुटत होते ,मिरवणुकांची तयारी सुरू होती. अशावेळी तमाम साहित्य रसिकांना ' सलाम ' करत था थोर कवी अनेक दशके शब्दांची आनंद उधळण करून काळाच्या पडद्याआड गेला होता.पण  अस्सल कवी, लेखक त्याच्या शब्दाच्या रूपाने चिरंजीवच असतो. मंगेश पाडगावकरही असेच रसिकांसोबत अनेक शतके राहणार आहेत.' एका युगाचा अंत होत असताना नव्या वर्षाचे स्वागतही आपण धीरोदात्त पणे केले पाहिजे ' हाच खरंतर पाडगावकरांच्या कवितेचा संदेश आहे...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार , वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post