प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२२ कोणताही प्रश्न अथवा विषय मांडत असताना त्याला सखोल अभ्यासाची दिलेली जोड , त्याची सोडवणूक करण्यासाठी केलेली नियोजनबद्ध आखणी व त्यामागे घेतलेले अपार कष्ट, स्वतः सतत कार्यमग्न राहून हाती घेतलेल्या विषयाला सामूहिकता कशी येईल यासाठी जाणीवपूर्वक दखल घेणे हे प्रताप होगाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने नव्हे तर देशाने एक मोठा वीजतज्ञ गमावला आहे. कारण त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने वीज ग्राहकांचे किमान चार हजार कोटी रुपयांची बचत त्यांनी केली होती.तसेच त्यांच्या जाण्याने इचलकरंजी आणि परिसराची राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक ,सहकार अशा सर्व क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. यंत्रमागधारक आणि कामगार,शेतकरी आणि कष्टकरी, उद्योजक आणि कर्मचारी, नेता आणि कार्यकर्ता अशा सर्वांनाच आपल्या हक्काचा वाटणारा हा माणूस होता. त्यांचे यथोचित स्मारक करून त्यांचे विचार व कार्य पुढे निर्णय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे विचार कालवश प्रताप होगाडे यांच्या आदरांजली सभेत व्यक्त करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनीत सर्व सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी होते. मंचावर प्रसाद कुलकर्णी, शामसुंदर मर्दा, विनय महाजन, संजय होगाडे, पुंडलीक जाधव ,जावेद मोमीन यांची उपस्थीती होती.
या सभेतून असे मत पुढे आले की, प्रताप होगाडे यांनी वयाच्या विशीमध्ये इचलकरंजीत शिवसेनेचे काम सुरू केले. त्यानंतर आणीबाणीत दिड वर्षे तुरुंगात असताना त्यांचा डाव्या समाजवादी मंडळींशी परिचय झाला. त्यातून ते समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते बनले. त्यानंतर समाजवादी विचारधारा घेऊन गेले अर्धशतक सतत कार्य केले. जनता पक्ष ,जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी पक्ष या पक्षात त्यांनी राज्यपातीवर प्रमुख पदाधिकारी म्हणून काम केले.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष ,सुळकूड पाणी योजना आंदोलनाचे समन्वयक, वस्त्रोद्योग, कृषी, सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षम, अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. इचलकरंजीतील डाव्या व पुरोगामी चळवळीचे ते सर्वमान्य नेतृत्व होते.
प्रताप होगाडे यांनी राजकारण, समाजकारण ,सहकार, साहित्य, संस्कृती , वस्त्रोद्योग, इंजीनियरिंग,नगरपालिका , शेती,वीज ,शिक्षण, गृहनिर्माण आदी विविध क्षेत्रात केलेले काम आणि त्यांच्या विविध व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, व्यक्तिगत पातळीवर आलेले अनुभव यावेळी अनेकांनी स्पष्ट केले. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांसह हसन देसाई,भरत लाटकर, इस्माईल समडोळे, शशिकला बोहरा, शिवाजी साळुंखे ,ओमप्रकाश पाटणी , प्राचार्य ए. बी. पाटील, बजरंग लोणारी, राजन मुठाणे, ऍड.जयंत बलुगडे, बाबासाहेब नदाफ, मुकुंद माळी, शाहीर विजय जगताप, धर्मराज जाधव , रावसाहेब तांबे काशिनाथ जगदाळे, काशिनाथ जगदाळे, विश्वनाथ मुसळे, समीर गोवंडे , अभिजीत पटवा , संदीप चोडणकर, अहमद मुजावर प्रताप होगाडे यांची कन्या मिथिला होगाडे,बंधू संजय होगाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या आदरांजली सभेला मिलिंद कोले,अहमद मुजावर, दत्ता माने, पद्माकर तेलसिंगे, पांडूरंग पिसे, किरण कटके,सुनील बारवाडे , सदा मलाबादे , शिवाजी शिंदे, रमेश मर्दा , हरी माळी, मनोहर नवनाळे, नौशाद जावळे,यांच्यासह राजकीय, सामाजिक ,औद्योगिक अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.