प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी ऊर्फ बाबा फत्तेसिंह घोरपडे (वय ३९, रा. अंबाई डिफेन्स कॉलनी, राजारामपुरी) यांच्यावर रविवारी रात्री उशिरा मानवाड ते बाजारभोगावच्या परिसरात अनोळखी पाच ते सहा जणांनी चाकू व दगडाने हल्ला केल्याची घटना घडली. यात ते गंभीर जखमी झाले. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारावर झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. निवडणूक विभाग व पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, संशयितांचा शोध घेत आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असताना एका उमेदवारावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे का? अशी चर्चा नागरिकांच्यात केली जात आहे. निवडणुकीत प्रचारादरम्यान उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर हल्ला, प्रतिहल्ला करण्याचे प्रकार होणे स्वाभाविक आहे. मात्र, आमदारकीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला घडल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे समजते.
घोरपडे हे रविवारी रात्री अकरा वाजता आपल्या कारमधून मानवाड ते पिसात्री-कोपार्डे गावी येत असताना रस्त्याच्या बाजूला अनोळखी पाच ते सहा लोक अंधारात उभे होते. त्यांनी घोरपडे यांच्या कारला हात करून ती थांबवली. कार्यकर्ते ओळखीचे असावेत म्हणून घोरपडे यांनी कार रस्त्याकडेला घेतली.
कारमधून उतरून ते थांबलेल्या लोकांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा त्यातील एकाने चाकूसारख्या धारदार हत्याराने वार केला. घोरपडे यांनी वार हातावर झेल्यामुळे ते जखमी झाले, तसेच कपाळावरही वार झाला. तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या कारवर दगड मारून काच फोडून कारचे नुकसान केले. हल्ला केल्यानंतर ते तरुण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
जखमी घोरपडे यांना तत्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजल्यावर पोलीस अधीक्षक महेद्र पंडित यांच्यासह पोलीस रुग्णालयात दाखल झाले. कळे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी अनोळखी पाच ते सहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. सपोनि. रणजित पाटील हे पुढ़ील तपास करीत आहेत.