प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com
२९ नोव्हेंबर रियासतकार सरदेसाई यांचा स्मृतिदिन.इतिहास संशोधन आणि लेखनाच्या क्षेत्रात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी खरोखरच डोंगराएवढे काम केलेले आहे . १७ मे १८६५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील शिक्षक होते.रियासतकारांचे प्राथमिक शिक्षण शिपोशी येथे झाले. नंतर माध्यमिक रत्नागिरीत,आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन (पुणे) एलफिस्टंन (मुंबई )येथे झाले. रत्नागिरीत त्यांना रावबहादूर गणेश व्यंकटेश जोशी आणि मोरेश्वर वामन कीर्तने या दोन विद्वान् शिक्षकांचा सहवास लाभला. कीर्तने यांच्या कन्या गंगुताई ( लक्ष्मीबाई उर्फ माई)यांच्याशी २९ फेब्रुवारी १८८४ रोजी त्यांचा विवाह झाला.
रियासतकारांवर सयाजीराव महाराजांचा अतिशय विश्वास होता. त्यांच्या बौद्धिक कामगिरीबद्दल अभिमान होता. परिणामी महाराजांबरोबर संपूर्ण भारत, युरोपातील काही देशातही ते गेले. जगातील अनेक समाज ,लोकरीती, स्वभाव, इतिहास, परंपरा आदी जाणून घेण्याची संधी मिळाल्याने रियासातका रांच्या विचारात प्रगल्भताही आली. १८८९ ते १९२५ अशी ३६ वर्षे रियासतकारानी आहेत सयाजीराव गायकवाड महाराजांकडे त्यांचे रीडर आणि युवराज यांचे ट्यूटर म्हणून पूर्ण निष्ठेने काम केले. त्यानंतर त्यांनी कामशेत येथे इंद्रायणी नदीच्या काठी आपल्या निवासस्थानी इतिहास लेखनाच्या कामात स्वतःला वाहून घेतले. त्यांची शामकांत व श्रीवत्स ही दोन मुले अकाली गेली. श्यामकांत शांतिनिकेतन मध्ये शिकून पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले होते. तेथे त्यांनी पीएचडी केली.पण तेथेच ते कालवश झाले.तर श्रीवत्स बारा वर्षाचा असतानाच गेला.तसेच १९४३ साली पत्नी लक्ष्मीबाईही कालवश झाल्या. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी म्हटले होते की,' सरदेसाई यांनी इतिहासालाच आपला मुलगा मानलेला आहे.
थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार आणि रियासतकार यांची अनेक वर्षाची प्रगाढ मैत्री होती. जदुनाथ सरकार यांनी सुचविल्या प्रमाणे मुंबई सरकारने रियासतकारांना पेशवे दप्तराचे संपादन करण्याचे काम करण्यास सांगितले . त्यांनी जवळपास ३५००० कागदपत्रांची तपासणी केली, त्यापैकी २७३३२ कागदपत्रे मोडी मराठीत , इंग्रजीमध्ये ७४८२, गुजराती मध्ये १२९ आणि २९ पर्शियनमध्ये होतो. त्यानंतर त्यांनी पेशवे दफ्तरचे ४५ खंड प्रकाशित केले. एकूण ७८०१ पृष्ठे आणि ८,६५० दस्तऐवज समाविष्ट त्यात केले.नंतर जदुनाथ सरकारसमवेत रियासतकारांनी ७१९३ पृष्ठांचा आणि ४१५९ पत्रांचा समावेश असलेला पूना रेसिडेन्सी पत्रव्यवहार संपादित आणि प्रकाशित केला.
मराठ्यांच्या इतिहासाचे सर्वोत्कृष्ट भाष्यकार असे सर जदुनाथ यांनी त्यांच्याबाबत म्हटले होते.सरदेसाई यांनी रियासतीचे तेरा खंड लिहिले. मराठी रियासत ,मुसलमानी रियासत, ब्रिटिश रियासत, न्यू हिस्टरी ऑफ मराठा मेन, करंटस ऑफ मराठा हिस्टरी, शालोपयोगी भारतवर्ष , बालपयोगी महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सोप्या गोष्टी, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. तसेच विविध ज्ञानविस्तार ,रत्नाकर, मनोरंजन, चित्रमय जगत, सह्याद्री इत्यादी विविध नियतकालिकातून साडेतीनशेवर लेख लिहिले. श्यामकांतची पत्रे आणि माझी संसार यात्रा ही आत्मचरित्रपर पुस्तके ही त्यांनी लिहीली.त्यांच्या भाषणांचा आणि टिपणांचा संग्रह सुद्धा मोठा आहे. रियासतकारांना पुणे विद्यापीठाच्या सन्माननीय डिलीट पासून भारत सरकारच्या पद्मभूषण पर्यंतचे अनेक गौरव प्राप्त झाले.
२९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचे निधन झाले.त्यांनी आपला ग्रंथसंग्रह पुणे विद्यापीठाला दिला.तो डेक्कन कॉलेजमध्ये ठेवलेला आहे .तसेच त्यांच्या पत्रव्यवहाराच्या फायली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. मराठी रियासतीच्या पहिल्या खंडात त्यांनी 'राष्ट्रीय इतिहास: अर्थ व्याप्ती आणि भूमिका' हा एक दीर्घ प्रास्ताविक लेख लिहिला आहे.१९३२ साली लिहिलेला हा लेख आजही अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे. या लेखात त्यांनी इतिहासशास्त्र, इतिहासाचा उपयोग व दुरुपयोग, धर्म आणि राजकारण, इतिहासाची साधने व साध्य, नवीन संशोधनाची गरज, इतिहासाचा मुख्य भाग, संशोधकांची कामगिरी, साधनांची योग्यता आदी विविध मुद्द्यांची सैद्धांतिक चर्चा केली आहे. रियासतकारांनी या लेखात शेवटी म्हटले आहे की ," व्यक्तीवर व प्रसंगावर इतिहास आपले मत देतो. ते केवळ तात्पुरते असते. त्यात अखेरचे किंवा ठाम असे काही नाही. एका पिढीने मान्य केलेले सिद्धांत पुढची पिढी तपासते.अर्थात मागील इतिहासकारांचे कार्य निकालासाठी पुढच्यांच्या न्यायासनापुढे दाखल होते.आणि पुढच्या अपिलाचा हा निकाल त्यावेळी मान्य होऊन एकंदर शास्त्राची परिणती होत जाते .इतिहास संशोधन व लेखनाला एक व्यापक दृष्टिकोन देणाऱ्या या थोर इतिहासकारांना विनम्र अभिवादन.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)