प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत 111 उमेदवारांचे 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत कार्यालयावर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली.
यामध्ये 94 उमेदवारांचे 118 अर्ज वैध ठरेल आहेत. तर 22 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. उरण मतदारसंघातून एकही अर्ज बाद झालेला नाही.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हयात शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडी अशा युत्या आणि आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहेत. त्याचबरोबर इतर बहुजन समाज पार्टी, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, लोकमुद्रा जनहित पार्टी, भारतीय जनसम्राट पार्टी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, अभिनव भारत पार्टी, लोकराज्य पार्टी, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन यांच्यासह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात महायुती, महाविकास आघाडीसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. उरणमध्ये महेश बालदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर तर महाविकास आघाडीच्या महाडमधील सेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई, पेणमध्ये अनंत गीते, अलिबागमध्ये दिवाकर रावते, आदी नेत्यांनी उपस्थिती लावली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 29 ऑक्टोबर रोजीच्या शेवटच्या दिवसअखेरपर्यंत पनवेल विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवारांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वाधिक अर्ज पनवेल तालुक्यात दाखल झाले आहेत. आज बुधवारी झालेल्या छाननीत 9 अर्ज बाद झाले आहे. येथे 15 उमेदवाराचे 21 अर्ज वैध ठरले आहेत.
कर्जत विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज बुधवारी झालेल्या छाननीत 2 अर्ज बाद झाले आहेत. येथे 12 उमेदवारांचे 13 अर्ज वैध ठरले आहेत.
पेण विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांनी 17 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज बुधवारी झालेल्या छाननीत 3 अर्ज बाद झाले आहेत. येथे 12 उमेदवारांचे 16 अर्ज वैध ठरले आहेत.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवारांनी 28 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज बुधवारी झालेल्या छाननीत 1 अर्ज बाद झाला आहे. येथे 22 उमेदवारांचे 27 अर्ज वैध ठरले आहेत.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवारांनी 20 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज बुधवारी झालेल्या छाननीत 4 अर्ज बाद झाला आहेत. येथे 12 उमेदवारांचे 16 अर्ज वैध ठरले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज बुधवारी झालेल्या छाननीत 3 अर्ज बाद झाले आहेत. येथे 5 उमेदवारांचे 8 अर्ज वैध ठरले आहेत.
उरण विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांचे 17 अर्ज दाखल झाले होते. येथे सर्व उमेदवारांचे सर्व अर्ज वैध ठरले आहेत.
येत्या 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहेत. त्यामुळे 4 नोव्हेंबरनंतरच रायगड जिल्हयात निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी जिल्हयात काही मतदारसंघात अपक्षांमुळे प्रमुख उमेदवारांपुढे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी कोण कोण अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उरणमध्ये सर्व अर्ज वैध
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत 111 उमेदवारांचे 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये 94 उमेदवारांचे 118 अर्ज वैध ठरेल आहेत. तर 22 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. उरण मतदारसंघातून एकही अर्ज बाद झालेला नाही.