प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत अनेक मतदारसंघात होणार आहे. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी, मनसे, परिवर्तन महाशक्ती, आणि या सर्व छोट्या मोठ्या पक्षांचे बंडखोर त्यासोबतच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचेही उमेदवार रिंगणात असणार आहे.मनोज जरांगे पुढील दोन दिवसांत त्यांचे उमेदवार कोण असणारे हे जाहीर करणार आहेत, त्यासोबतच कोणाला पाडणार आणि कोणाला पाठिंबा देणार याचीही त्यांची वेगळी यादी असणार आहे. त्यांच्या या यादीला ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आव्हान दिले आहे. जरांगेंनी त्यांची यादी जाहीर केल्यानंतर आम्ही देखील आमची यादी जाहीर करणार असल्याचा दावा हाके यांनी केला. ते येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
विधानसभेसाठी मनोज जरांगे यांनी एमएमडी (मराठा - मुस्लिम - दलित) समीकरण तयार केले आहे. अंतरवाली सराटी येथे गुरुवारी मुस्लिम धर्मगुरु, बौद्ध धर्मगुरु तसेच काही अध्यात्मिक गुरु यांच्यासोबत मनोज जरांगे यांची बैठक झाली. यावेळी आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर देखील उपस्थित होते. या सर्वांना घेऊन त्यांनी मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. तर राखीव मतदारसंघांमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याचीही यादी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात कोणाला पाडायचे आणि कोणीला निवडून आणायचे याचीही वेगळी यादी असणार आहे. सोमवारी ही यादी ते प्रसिद्ध करणार आहेत .